नंदुरबार l प्रतिनिधी
मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार असल्याने ही योजना कामगारासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते आज शहादा तालुक्यातील मुबारकपूर, तलवाडे, मळकाणी, फत्तेपूर या गावांत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, सरपंच मोहन ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना सुरू केल्या त्या योजना पैकी मुख्य योजना म्हणजे मध्यान्ह भोजन योजना होय, त्याच प्रमाणे बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, अपघाती मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, तसेच कामगाराच्या मुलांसाठी शिक्षण खर्च, लग्नासाठी 30 हजार आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी तसेच हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजाराचे अर्थसहाय्य,गृहपयोगी वस्तु संच, सुरक्षा संच देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज तसेच इतर विविध योजनेचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांचे ‘ड’ यादीत नाव नसलेल्या तसेच ज्या लोकांना घर नाही अशा पात्र व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. कामगारांनी आपल्या मुलांना उच्च व चांगले शिक्षण देण्यासाठी नियमित शाळेत पाठवावेत जेणे करून ते उच्चशिक्षित होतील असे त्यांनी सांगितले.
मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना दोन वेळा जेवणात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर पदार्थांचा देण्यात येईल .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत आहेर यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,कामगार उपस्थित होते.








