म्हसावद l प्रतिनिधी
आदिवासी संस्कृतीचा सर्वत्र गौरव होत असला तरी सुधरल्याचा आव आणणाऱ्या बहुतांश नोकरदारांना मात्र याच गौरवशाली परंपरेची लाज वाटते. आपण जातीच्या नावाने नोकऱ्या मिळवल्याने समाजाचे काही तरी देणं लागतो. यानुसार समाजाच्या प्रत्येक नोकरदाराने परंपरेतील प्रत्येक बाब अवलंबत संस्कृती संवर्धनाचा प्रयत्न तरी करावा, अशा रखरखत्या भावना मोलगीत व्यक्त झाल्या.
आदिवासी एकता परिषद व संबंधित संघटनांची मोलगी ता.अक्कलकुवा येथे चिंतन सभा घेण्यात आली. सभेत जि.प.सदस्य सी.के.पाडवी, करमसिंग पाडवी, रामजी गुरुजी, माजी जि.प.सदस्य सिताराम राऊत, पं.स.सदस्य आपसिंग वसावे, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, बाज्या वळवी, वाण्या वळवी, सत्या राऊत, सरपंच दिलीप राऊत, सागर पाडवी, गुमानसिंग तडवी, माजीसरपंच अमृत वळवी,सरपंच खुमानसिंग तडवी, ॲड.सरदारसिंग वसावे,पचायत समिती सदस्य तुकाराम वसावे ,पत्रकार रविंद्र वळवी, मंगेश वळवी, धिरसिंग वळवी, ब्रिजलाल पाडवी यांच्यासह अन्य आदिवासी चळवळकर्ते संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भिल महापंचायतीसाठी आचारसंहितेचा मसुदा तयार करणे, मोलगी तालुका निर्मिती कार्याला पाठबळ देणे, आदिवासींच्या भौतिक, आरोग्य व दळणवळणच्या सुविधांअभावी निर्माण होणाऱ्या समस्या यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बहुतांश शिक्षीत व नोकरदार आदिवासी परक्या देव-देवतांना आपले कुलदैवत मानत ते विविध पंथ, संप्रदाय व धर्मात सामील होत आहे. गोवाण, आठीवटी व पांढर पूजत नाही. त्यांच्यासाठी या सभेत, आपले मूळचे दैवत चुकीचे आहेत काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिकलेल्या आदिवासीने शिक्षण व नोकरीच्या बळावर आपली गौरवशाली प्रथा अन्य समाजासमोर आदर्श म्हणून ठेवणे अपेक्षित होते, प्रथेला लिखीत रुप देत आदिवासींचा मानाचा तुरा सलामत ठेवणे गरजेचे आहे. परंतु बहुतांश बांधवांना संस्कृतीची लाज वाटते, बोलीभाषा बोलायला हिनता वाटते. अलिखीत आचारसंहितेला ‘समाजाचा आरसा’ अशी ओळख मिळवून देणे गरजेचे आहे. मात्र त्यांना या आचारसंहितेची कुठलीच जाणीव नाही, आदिवासी महिन्यांची नावे व सणोत्सव सांगताच येत नाही. खाद्य संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला. ज्या आहारातून रोगप्रतिकार शक्ती मिळते, त्या
वर संशोधन करीत या खाद्य संस्कृतीचे महत्त्व वाढवणे गरजेचे असताना त्यालाही नाकारत अन्य दुर्बल आहाराचा अवलंब करीत आहे, म्हणूनच जेवढे शिकले तेवढे चुकलेही असे सभेत म्हटले गेले.
आदिवासी संस्कृतीच्या ऱ्हासात शिक्षित, नोकरदारांपाठोपाठ राजकीय व्यक्तीही बऱ्यापैकी पापाचे वाटेकरी ठरतात. कारण आज राजकीय व्यक्ती, नेते व लोकप्रतिनिधी यांच्याकडे मनुष्यबळासह अन्य बरीच ताकद असते. यांच्या जोरावर ते संस्कृती वाचवण्यासाठी चांगले योगदान देऊ शकतात. परंतु तसे त्यांच्याकडून होतच नाही. शिवाय काही राजकारणी आपल्या घरातील सुख-दु:खात अन्य समाजातील परंपरा अवलंबतात. त्यामुळे हे घटकही याबाबतीत काही अंशी भटकल्याचे दिसतात, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
आदिवासींच्या ज्वलंत समस्यांपैकी आदिवासी मुलींच्या परराज्यात विवाह लावणे ही एक समस्या आहे. यासाठी लाखोंमध्ये सौदा होत असून ठिकठिकाणी एजंटही विखुरले आहे. या एजंटांची भूमिका आदिवासींसाठी अस्मिता व आत्मसन्मानाला ठेच पोहोचणारी ठरते. या एजंटांचा समाचार घेत त्यांची यादीच तयार करण्यात आली. शिवाय परराज्यात लग्न झालेल्या भगिनींच्या व्यथांवरही चर्चा करीत हा सौदा थांबवण्याचे आवाहन करण्यात आले.








