नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मासलीपाडा गावाजवळ नवापूर हुन येणारी नाशिक नवापूर बस व समोरून येणारा मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. तर बसमधील १५ प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेचे पायलट सुभाष गावित, मानसिंग गावित डॉक्टर विशाल गावित यांनी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचार करून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले होते.
यात समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे नाशिक नवापूर बस ( क्र.एम एच.०६ एस.८४९६ ) व समोरून येणारा मालवाहू ट्रक ( क्र.टी.एन.५२.ए ए.२६१३) यांच्यात भीषण धडक झाली. महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून अपघात झाला आहे. या दरम्यान एकाच मार्गवर दोन्ही बाजूची वाहने येजा करत असल्याने सदर अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की मालवाहू ट्रक व बस या दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.
तर ट्रक चालक प्रकाश पालन स्वामी रा.तामिळनाडू हाbआत मध्ये अडकल्याने जागीच ठार झाला आहे. या अपघातात बसमधील योगेश रावसाहेब मरसाळे, संदीप वसंत अंभोरे,मनोज रामदास मांडोळे, मिनाबाई सुभाष अंभोरे, ताईबाई भिका आस्वार,कविता योगेश मरसाळे,आशाबाई रामदास मांडोळे, उषाबाई वसंत आंबोरे, ज्योती जयराम गावित, वनिता अनिल वसावे, राहुल भाऊसाहेब पवार यांच्यासह बस चालक बाळासाहेब सर्जेराव तिडके वाहक जखमी असे १५ जण जखमी आहेत.अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तर विसरवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.