नंदूरबार l प्रतिनिधी
दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात 6 जून 2023 पासून राबविण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हास्तरावर ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ’ शिबिराचे आयेाजन करण्यात येणार असून या शिबिरात शासनाच्या सर्व विभाग, सर्व शासकीय यंत्रणा, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेणार आहे. तसेच दिव्यांगांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे, दिव्यांगत्वाचे युडीआयडी प्रमाणपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक त्या प्रमाणपत्राचे वाटप तसेच शासकीय योजनांतून वा सामाजिक संस्था वा सीएसआर मार्फत उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणाचे वाटप करण्यात येणार आहे.
या अभियानासाठी शासनाने दोन लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून या अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक तथा आमदार बच्चू कडू यांच्या कार्यालयाकडून स्वतंत्रपणे तारीख कळविल्यानंतर जिल्हास्तरावर शिबिराचे आयेाजन करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी आपली नोंद ग्रामपंचायत, नगरपालिका येथे करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.नांदगावकर यांनी केले आहे.








