तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदासह रांझणी, रोझवा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून
तळोदा तालुक्यातील रांझणी गावाजवळ हाकेच्या अंतरावर नर-मादी बिबट तसेच दोन ते तीन बछडे यांचा रात्री ८ ते ९ च्या सुमारास मुक्त संचार दिसून आला होता.
दि.१९ सप्टेंबर रोजी रांझणी गावातील विठ्ठल-रुखमाई मंदिराच्या मागील बाजूस वसलेल्या रांझनी प्लॉट भागातील ग्रामस्थाला वराह जोरजोराने ओरडत असल्याने त्यांनी घराचा छतावर चढून एलईडी टॉर्चने लांब पर्यंत प्रकाश टाकला असता दोन बिबट्यांनी वरहाला सावज केल्याचे दिसून आले. तद्नंतर त्या ग्रामस्थांनी घरांच्या छतावर चढून पुन्हा बॅटरीचा प्रकाश झोतात पाहिले असता नंतर बिबट्याचे दोन ते तीन बछडे एक मागून एक निघाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तसेच चिनोदा येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतकरी व शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून चिनोदा, रांझणी, रोझवा या भागात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून चिनोदा, रांझणी, रोझवा शिवारात बिबट्याने वराह, श्वान, गायीचे वासरू, शेळ्या फस्त केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतकरी दिपक जगन्नाथ पटेल हे आपल्या फवारणी करणाऱ्या मंजुरांकडे शेतात जात असतांना त्यांना केळीच्या शेतात प्रत्यक्ष डोळ्यासमोर चक्क दोन बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने ते घाबरून लागलीच माघारी परत फिरून घरी परतलेत. त्यामुळे शेतकर्यांना फवारणीसह इतर शेतीची कामे करणे सुध्दा जिकरीचे झाले आहे.
सध्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करण्यात येत असून त्यात पिकांना रासायनिक खते देणे, विविध औषधांची फवारणी करणे, मिरची तोडणी, केळी काढणी अशी शेतीची कामे करणे शेतकऱ्यांकडून करण्यात येत असल्याने त्यातच शेतशिवारात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने ठोस उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.