नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील देसाईपुरा भागात मजूर पिंपळाचे झाड तोडत असताना झाडाचे मोठे खोड घरावर पडल्याने सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.
अधिक माहितीनुसार, नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात राहणाऱ्या शकुंतला अशोक मराठे यांच्या घरासमोर भलं मोठं पिंपळाच झाड आहे. या झाडाचा काही भाग तोडण्यासाठी त्यांच्या शेजारील हर्षल त्रिवेदी नावाच्या व्यक्तीने काही मजुरांना पाठवले होते. या मजुरांनी हे पिंपळाचे झाड तोडत असताना समोरील घरात असलेल्या नागरिकांना याबाबत कुठलीही माहिती न देता झाड तोडण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.

झाडावरील मोठे खोड तोडत असताना ते दोरखंडातून अचानक निसटल्याने झाडाखाली असलेल्या घरावर जाऊन आदळले.या अपघातात घरात बसलेले नीलेश अशोक मराठे (३९), हरीश अशोक मराठे (३५), हरीश मराठे (१०),
श्याम हरीश मराठे (८), भाविका नीलेश मराठे (३), कीर्ती जयेश मराठे (३२), उन्नू नीलेश मराठे (३) हे सात जण जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.. घटनेनंतर झाड तोडणारे मजूर देखील घटनास्थळावरून पसार झाले होते. याबाबत नंदुरबार शहर पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत.