नंदुरबार l
मेंढपाळ धनगर समाजात लागु असलेल्या योजना मेंढपाळ ठेलारी समाजालाही लागू कराव्यात, अशी मागणी युवा ठेलारी संघातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन युवा ठेलारी संघातर्फे विधान परिषदेचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांना देण्यात आले.
युवा ठेलारी संघाचे महाराष्ट्र प्रदेश सहउपाध्यक्ष सावळीराम करिया दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळ धनगर समाजाबरोबरही मेंढपाळ ठेलारी समाज हा भटका समाज असून तो आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच मेंढी चराईसाठी दिवस-रात्र भटकंतीवर असतो. त्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाजाला न्याय मिळत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने एन.टी. ‘क’ मध्ये येणार्या समाजांना ज्या सवलती महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आहेत,
त्या सवलती एन.टी. ‘ब’ मधील फक्त मेंढपाळ ठेलारी समाजाला सुद्धा लागु करण्यात याव्यात. कारण धनगर आणि ठेलारी समाजात खुपच साम्य असून आज मेंढपाळ धनगर समाज शिकुन तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असून मेंढपाळ ठेलारी समाजाच्या लोकांची कायम भटकंती असते. त्यामुळे त्यांची मुलेही शिक्षणापासून वंचित राहत असतात. त्यांना राज्य शासनाच्या कुठल्याही सवलती मिळत नाहीत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देवून महाराष्ट्रातील मेंढपाळ ठेलारी समाजाला एन.टी. ‘क’ प्रमाणे सवलती द्याव्यात. जेणेकरुन मेंढपाळ ठेलारी समाजातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाता येईल.
तसेच घरकुल, महामेष योजना व इतर आर्थिक लाभही मेंढपाळ ठेलारी समाजातील लोकांना मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या अशा दुजाभावामुळे मेंढपाळ ठेलारी समाजात अत्यंत नाराजगी असून आमची आपणांस विनंती आहे की, आपण ठेलारी समाजासाठी विशेष महामंडळाचे गठन करावे व ठेलारी समाजाचा उद्धार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी युवा ठेलारी संघाचे प्रदेश सहउपाध्यक्ष सावळीराम करिया, युवा मल्हार सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे, देवा मानवर, मकडू टकले, बंडू गोयकर, सुका टकले, किशोर कोळेकर, मगन गोयकर, काशिराम श्रीराम, विठ्ठल टकले, कृष्णा करे, नथा गोयकर आदी उपस्थित होते.








