नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे मद्यपी वाहन चालकाविरुध्द् विशेष मोहीम राबविण्यात आली असून चार महिन्यात 348 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.
सण उत्सवादरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच मद्यपान करुन वाहन चालविल्यामूळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच दारु पिवून वाहन चालविणारे किरकोळ कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा इसमांविरुध्द् व दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संपूर्ण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने संपुर्ण नंदुरबार जिल्हयात दि. 9 एप्रिल ते 10 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान एकुण 44 वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्याविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
तसेच 11 एप्रिल ते 9 मे 2023 या कालावधीमध्ये पुन्हा ठिक- ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली असता नंदुरबार शहर पोलीस ठाणे-23, उपनगर पोलीस ठाणे- 7, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे- 5, नवापूर पोलीस ठाणे-12, विसरवाडी पोलीस ठाणे- 13, शहादा पोलीस ठाणे-27, धडगांव पोलीस ठाणे- 13, म्हसावद पोलीस ठाणे-10, सारंगखेडा पोलीस ठाणे- 14, अक्कलकुवा पोलीस ठाणे- 23, तळोदा पोलीस ठाणे-14, मोलगी पोलीस ठाणे-5 असे एकुण 166 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून 1 जानेवारी ते दिनांक 9 मे या कालावधीत वेळोवेळी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या 348 वाहन चालकांवर गुन्हे करण्यात आलेले आहे.
दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मद्यपान करुन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. मद्यपान करुन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.