नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील जगतापवाडीत लग्न मंडपाजवळून जात असल्याचे वाईट वाटून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील बापूजी नगरातील अभिषेक कैलास मोरे व त्याचा आत्याचा मुलगा निलेश भाऊसाहेब आजगे हे जगतापवाडी येथे मेसचे जेवण घेवून राम मोतीलाल माळी यांच्या लग्न मंडपाजवळून गेले. याचे वाईट वाटून अभिषेक मोरे व निलेश आजगे यांना राम मोळी व इतर १२ जणांनी शिवीगाळ करीत जमाव करुन हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच खुर्चीने अभिषेक मोरे यांच्या पाठीवर, हातावर, डोक्यावर व पोटावर मारुन दुखापत केली. याबाबत अभिषेक मोरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात राम मोळी व इतर १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पवार करीत आहेत.