नवापूर । प्रतिनिधी
तालुक्यातील 244 रस्त्यांच्या कामांमध्ये 35 कोटी 54 लाख 90 हजारांच्या निधीपैकी काही रस्त्यांची कामे न करता अपहार झाला आहे. त्याची निःपक्षपणे तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्याकडे पंचायत समिती सभापती बबिता गावीत यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली.
निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नवापूर तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष सन 2022-23 मधील नवापूर तालुक्यातील 3054 योजने अंतर्गत 244 रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. या कामासाठी शासनाने 35 कोटी 54 लाख 90 हजारांचा निधी मंजूर केला होता. तालुक्यात सदर कामे जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी व त्यांचे संबंधित ठेकेदार यांनी केली. रस्त्यांची काही कामे केली, काही अर्धवट केली, मात्र त्यातही कामाचा दर्जा अत्यंत नित्कृष्ठ आहे.
याबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रार करत आहेत. काही कामे केवळ कागदोपत्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्यांची काम न करता परस्पर निधीचा अपहार झाल्याचे दिसून येते. मंजूर विकास कामे प्रत्यक्षात न करता कामांचे 35 कोटी 54 लाख 90 हजारापैकी बहुतांश प्रशासकीय निधीचा परस्पर अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. नवापूर तालुक्यातील 3054 अंतर्गत योजनेचा गावनिहाय 244 कामांची यादी सोबत जोडलेली आहे. त्या गावांची निपक्षपणे तत्काळ सखोल चौकशी करावी अशी मागणी सभापती बबिता गावीत यांनी केली आहे.
निवेदन देतांना पंचायत समिती सभापती बबिता गावीत, उपसभापती शिवाजी गावीतसरपंच आर.सी.गावीत, पं.स.सदस्य दशरथ गावीत, धारसिंग गावीत, चांदूलाबाई वसावे, नरेंद्र गावीत, काँग्रेस तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, करणसिंग गावीत, संतोष गवळी उपस्थित होते.