नंदुरबार l प्रतिनिधी
विसरवाडी येथील रहिवासी व्दारकाबाई सुभाषचंद्र अग्रवाल यांनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरंस कंपनी लि. यांच्याकडून हेल्थ पॉलिसि काढलेली होती. सदर पॉलिसिच्या कालावधीत व्दारकाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचाराकरीता शाल्बी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, सुरत येथे दाखल करण्यांत आले. व तेथे त्यांचा उपचार करण्यांत आला. उपचाराकरीता त्यांना लागलेल्या खर्चाची मागणी ज्यावेळी त्यांनी विमा कंपनीकडे केली, तेव्हा विमा कंपनीने त्यांचा कॅशलेस तसेच विमा दावा विमेधारकाला पॉलिसि घेण्यापुर्वीपासून आजार होता व तो आजार विमाधारकाने पॉलिसि घेतांना लपविला असे कारण देवून नाकारला. याबाबत व्दारकाबाई यांनी नंदुरबार ग्राहक आयोग येथे विमा कंपनी विरुध्द तक्रार ॲड. निलेश देसाई मार्फत दाखल केली. दाखल तक्रार, शपथपत्र, इतर कागदपत्र व वकीलांचा युक्तीवाद तसेच दाखल न्यायनिवाडे या सर्वांचे सखोल अवलोकन करुन अध्यक्ष. एस.पी.बोरवाल तसेच. सदस्या श्रीमती बी.पी.केतकर यांनी सदरची तक्रार मंजुर करुन विमा कंपनीने तक्रारदार यांना उपचाराच्या खर्चाची रक्कम २ लाख ३९ हजार रुपये, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम १० हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च ५ हजार रुपये आदेश तारखे पासून ४५ दिवसांत दयावी तसेच त्यांची बंद असलेली पॉलिसि पूर्नजिवित करावी असा आदेश पारित केला.