नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे सुरु करण्यात झालेल्या आकाशवाणीच्या एफ.एम केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्यांचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार येथे आज आकाशवाणीच्या एफ.एम केंद्राचे तसेच देशातील विविध ठिकाणाच्या 91 व 100 वॉट ट्रान्समीटरच्या एफ.एम. केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रीमोट पद्धतीने संपन्न झाले. त्याप्रसंगी डॉ.गावित पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते.
या कार्यक्रमाला खासदार डॉ.हिना गावित, आकाशवाणी जळगावचे केंद्र प्रमुख दिलीप म्हसाने, कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे, प्रा.डॉ.पितांबर सरोदे यांच्यासह नागरिक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असून येथे आकाशवाणीचे केंद्र नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजना व धोरणांची माहिती मिळत नव्हती. परंतू आज माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील केंद्राचे उद्घाटन झाल्याने ती माहिती येथील नागरिकांना मिळणार आहे. आकाशवाणीकडे देशातील राजकीय नेते, समाज सुधारक, सामाजिक कार्यकर्ते यांची संकलीत केलेली अनेक दुर्मीळ माहिती आकाशवाणीकडे आहे.
त्यामुळे ज्या ज्या वेळी या माहितीची गरज असते त्यावेळेला ती जनतेला उपलब्ध करुन देत असल्यामुळे या माहितीचा उपयोग नागरिकांना मिळणार असल्यामुळे नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळू शकेल. आकाशवाणीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, विविध पिकांच्या पीक पद्धती यांची माहिती मिळेल.तसेच विविध तंज्ञ मान्यवराशी झालेली चर्चा सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत निश्चीतपणे उपयोग होऊ शकणार आहे.
याच बरोबर आकाशवाणीकडे अनेक जुन्या व नव्या गाण्याचा संग्रह असल्यामुळे नागरीकांना व विद्यार्थ्यांना माहिती बरोबरच सुमधूर संगीतांचा लाभ मिळणार आहे, असे सांगून जिल्ह्याच्या खासदार डॉ.हिना गावित यांनी नंदुरबार येथे आकाशवाणीचे केंद्र सुरु केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
खासदार डॉ.गावित म्हणाल्या की, 2014 पासून जेव्हा खासदार झाले तेव्हापासून नंदुरबार येथे एफ.एम केंद्र सुरु करण्याची मागणी होती. व त्यावेळी पासून हे केंद्र सुरु होण्यासाठी मी केंद्र सरकारशी सातत्याने पाठपुरावा करत होते. नंदुरबार येथे आकाशवाणी केंद्र सुरु होण्यासाठी माहिती व प्रसारण विभागाकडे पाठपुरावा करत असतांना एक गोष्ट लक्षात आली की, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने येथे एफ.एम केंद्र सुरु करण्यासाठी खाजगी कंपनीचे इच्छुक नव्हती. त्यामुळे मी शेवटी केंद्र सरकारकडे येथे केंद्र सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला.
आणि या पाठपुराव्यास आज यश मिळाले असल्याने त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा युवा कार्य आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांचे आभार मानले. या एफ.एम चॅनेलमुळे नंदुरबार जिल्ह्यातील युवा, महिला, शेतकरी तसेच प्रत्येक घटकाला एफ.एमच्या माध्यमातून आपल्या आवडीचे कार्यक्रम आता ऐकता येणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरस्थप्रणालीवरुन देशातील विविध केंद्राचे उद्धटन केले व आपले मनोगत व्यक्त केले.