नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 8 तासात उघड करीत दोन लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत एकास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 एप्रिल रोजी रात्री 3.45 वा. सुमारास गीता सचानंद गंगवाणी रा. जुनी सिंधी कॉलनी, प्लॉट नंबर- ई-4 यांचे राहते घराचे स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा अज्ञात आरोपीताने उघडून घरातील कपाटामधून 2 लक्ष 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोबाईल चोरुन नेला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा नोंदविण्यात आला होता.
25 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुनी सिंधी कॉलनी येथे सकाळी झालेली घरफोडी नंदुरबार शहरातील सराईत आरोपी बुट्टा याने केलेली असून तो गिरीविहार गेट परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना सांगितली. उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयीत आरोपी बुट्टा याचा गिरीविहार गेट परिसरात जावून शोध घेतला असता काका का ढाबा येथे तो दिसला. उपनगर पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला, परंतु पथकाने त्यास पाठलाग करुन विशाल ऊर्फ बुट्टा विजयकुमार तलरेजा रा. बाबा गरीबदास मंदिराच्या मागे, सिंधी कॉलनी, नंदुरबार यास अटक केली. त्याची कायदेशीर प्रक्रिया करुन झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 60 हजार 800 रुपये रोख, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण 2 लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतास वरनमुद सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्याने जुनि सिंधी कॉलनी येथे एका घराचा स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा उघडून घरातील कपाटातून चोरी केलेबाबत सविस्तर माहिती दिली.
त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतावर यापूर्वी देखील नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुध्द्चे 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजून आल्याने त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.
घरफोडी सारखा मालमत्तेविरुध्द्चा गंभीर गुन्हा अवघ्या 8 तासात उघड करुन मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकास पेालीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक प्रविण कोळी, सहा. पोलीस उप निरीक्षक पानाजी वसावे, पोलीस अंमलदार विलास वसावे, विपुल पाटील, बाबुराव बागुल यांच्या पथकाने केली आहे.