भारतीय कृषि अनुसंधान परिषद-अखिल भारतीय समन्वयित (संगमनेरी क्षेत्रीय युनिट) शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार-सिलेज प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने “शेळी व्यवस्थापन” यांवर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय मंडकमाले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले, शेळीला “गरिबांची गाय” तसेच तसेच शेळीला “एटीएम” सुद्धा म्हटले जाते. ग्रामीण भागातील शेतकरीसाठी जोडव्यवसायाला नेहमीच साथ देत असते. शेतकऱ्यांनी उत्तम चारा लागवड, पाणी व्यवस्थापन, लसीकरण, जंतनाशक व विक्रीचे नियोजन केले तर नक्कीच शेळीपालन व्यवसाय यशस्वी ठरत असतो आणि शेळींची विक्री- खरेदी, प्रशिक्षण करिता आपण शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा स्थापन करू शकतो असे मार्गदर्शनात म्हटले.
या कार्यक्रमात जयंत उत्तरवार यांनी प्रास्ताविकात खांडबारा येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या वतीने सुरु असलेला सिलेज प्रकल्प मधील एकात्मिक शेती प्रयोग चारा लागवड, फळबाग लागवड, भाजीपाला, अझोला, गांडूळखत निर्मिती, कुक्कुटपालन, गोपालन, शेळीपालन विषयी अधिक माहिती सांगितली. या सिलेज प्रकल्पातील एकात्मिक शेती मधील भागधारक यशस्वी शेतकरी शेळीपालनाचे प्रयोग यशस्वीरित्या करीत आहेत. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जवळजवळ बरेचसे शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत पण शेती करत-करत जोड व्यवसाय करणे
अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे झाले आहे.
तसेच राजेश भावसार, प्रक्षेत्र व्यवस्थापक, कृषि विज्ञान केंद्र यांनी मार्गदर्शनात शेळीपालन व्यवसाय हा शेतीसाठी उपयुक्त जोडधंदा म्हणून गणला जातो. या व्यवसायाच्या वाढीसाठी जनावरांच्या आहारावर विशेष भर दिला पाहिजे. जनावरांना वर्षभर हिरवा चारा
मिळवा म्हणून चारा व्यवस्थापन गरजेचं आहे. चारा पिकांपैकी स्टायलो हेमाटा, COFS-29, दशरथ या गवताची लागवडीचे क्षेत्र वाढविले पाहिजे अशी माहिती दिली. पशुधन व्यवस्थापनावर बोलताना पशुतज्ञ डॉ. महेश गणापुरे यांनी विशेषतः शेळीसाठी
स्वतंत्र गोठा व्यवस्था करावी, गोठा व आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा, गोठ्यात जंतनाशक फवारणी, तसेच लसीकरण शेळ्यामध्ये विविध आजारांचे पशु आरोग्य रक्षकांच्या माध्यमातून तपासणी करणे महत्त्वाचे आहे. तसेच उन्हाळ्यात शेळ्यांना पोषक घटकांच्या अभावी अनेक आजार होत असतात त्याकरीता खनिज मिश्रणाचा योग्य वापर करावा व आपल्या कडे असलेल्या शेळींसाठी पशुसंवर्धन विभागाला संपर्क करून विमा त्वरित काढावा असे मार्गदर्शनात सांगिलते.
तसेच शेळी सुधार प्रकल्पाचे श्री गौरव घोलप यांनी सांगितले कि, उन्हाळ्यात शेळ्यांचे वजन कमी होणे, उष्माघात तसेच मांस उत्पादनात घट यांसारख्या समस्या दिसून येतात, शेळी मधील विविध आजार त्यात ब्रूसेल्लोसिस व पीपीआर हे शेळ्यांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत. रोगाचा प्रसार आजारी जनावरांचा चारा, वैरण, स्रावाद्वारे होतो आजाराचे वेळेवर निदान करून उपचार करून घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शनात म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप कुवर यांनी केले.
या कार्यक्रमसाठी सिलेज प्रकल्पातील एकात्मिक शेती प्रकल्पातील २५ भागधारक उपस्थित होते. यावेळी या प्रत्येक शेतकऱ्याला जातिवंत २ संगमनेरी शेळ्या प्रयोगासाठी आदिवासी उपयोजना अंतर्गत शेळी सुधार प्रकल्प, राहुरी यांचे कडून देण्यात आल्या.








