नंदूरबार l प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून जिल्ह्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड करीत 63 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
1 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील कोकणी हिल भागात IDBI बँकेजवळ एक इसम विना नंबरच्या मोटार सायकलवर फिरत असून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत आहे अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील कोकणी हिल भागात IDBI बँकेच्या परिसरात जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयीत आरोपीताचा शोध घेत असतांना एक इसम विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पॅशन मोटार सायकलवर बसलेला दिसून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता विजय रमेश दाभाडे, वय- 29 वर्षे, रा. इंदिरा नगर, भडणे ता. साक्री जि. धुळे असे सांगितले. त्यास त्याचे ताब्यातील मोटार सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात चांदीचे 5 हजार रुपये किमतीचे गोलाकार पायातील दोन व हातातील दोन कडे, 8 हजार रुपये किमतीचे 1 सोन्याचे ओम पदक तसेच त्याचे मोटार सायकलची किक असलेल्या बाजूला लोखंडी टॅमी आढळून आली.
त्यास त्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने सदरचे दागिने हे एक ते दिड वर्षापूर्वी नवापूर शहरातील एका बंद घराचे रात्रीच्या वेळी कुलुप तोडून चोरी केल्याचे सांगितले. तसेच ते दागिने नंदुरबार शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने आला असल्याचे सांगितले.
त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या वस्तूंच्या वर्णनाचे नवापूर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील गेल्या मालासोबत तुलना केली असता सदरचा मुद्देमाल हा नवापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 454, 457, 380 मधील असल्याचे निष्पन्न झाले. संशयीत आरोपी विजय दाभाडे याच्या ताब्यात मिळून आलेले सोने, चांदीचे दागिने व मोटार सायकल कायदेशीर कारवाई करुन जात करण्यात आली.
संशयीत आरोपीताकडुन नंदुरबार जिल्हयातील मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून अधिक विचारपुस केली असता,
त्याने मागील दोन वर्षाच्या काळात नंदुरबार शहरातील कोकणी हिल, माळीवाडा, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, जायखेडा, धुळे जिल्ह्यातील साक्री शहर तसेच साक्री तालुक्यातील म्हसदी, देऊर, धाडणे, मालपूर, कासारे, शेवाळी, पिंपळनेर, दहिवेल येथे रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलुप लोखंडी टॅमीने तोडून चोरी केलेबाबत सविस्तर माहिती दिली. नंदुरबार शहरात कोणत्या ठिकाणी घरफोडी केली आहे याची खात्री व्हावी याकरीता संशयीत विजय रमेश दाभाडे यास खाजगी वाहनाने तो सांगत असलेल्या ठिकाणी माळी वाड्यात घेवून गेलो असता 19 ऑक्टोंबर 2021 रोजी सदर ठिकाणी घरफोडी झाल्याची माहिती मिळाली.
त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ताब्यात घेण्यात आलेला संशयीत विजय दाभाडे याने नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, जायखेडा, धुळे जिल्ह्यातील साक्री शहर तसेच साक्री तालुक्यातील म्हसदी, देऊर, धाडणे, मालपूर, कासारे, शेवाळी, पिंपळनेर, दहिवेल येथे रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलुप लोखंडी टॅमीने तोडून चोरी केलेबाबत सविस्तर माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून नंदुरबार जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्दचे 2 व नाशिक जिल्ह्यातील 2 व धुळे जिल्ह्यातील 10 असे एकुण 14 मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे उघडकीस आणून 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कामगिरी करणाऱ्या पथकाचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. तसेच संशयीत आरोपी विजय दाभाडे याचेवर यापूर्वी देखील धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री, निजामपूर येथे 6 मालमत्तेविरुध्दचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार विनोद जाधव, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, जितेंद्र ठाकुर, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, आनंदा मराठे, अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने केली आहे.









