नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे शेतकऱ्याची बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून कर्ज वेळेवर न चुकवता आल्याने शेतातील पिकावर फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि त्यातच डोक्यावर बँकेच्या कर्जाचा बोझा यामुळे नंदुरबार तालुक्यातील नगाव (भालेर) येथील शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे, 56 वर्षीय संजय साहेबराव पाटील या शेतकऱ्याने पीकावर फवारणीसाठी वापरले जाणारे औषध घेवून त्यांनी आत्महत्या केली आहे,
या शेतकऱ्यावर नंदूरबार शहरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे 80 हजार रुपयांचे तर ठिबक साठीचे दिड लक्ष रुपयांचे कर्ज होते, मात्र गारपिट व अवकाळीने हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने सदरचा शेतकरी चिंतेत होते, व त्याचे मानसिक संतुलन अस्थिर झाल्याने त्याने चिंतेच्या आणि कर्ज कसे चुकवावे या मनस्थितीत शेतातील फवारणीचे औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.








