शहादा l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मराठवाड्याच्या दौरा आटपून पुढील महिन्यात मी पुन्हा पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार करण्यासाठी येईन असे प्रतिपादन जलसंपदामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
शहादा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर बुथ समित्यांचे गठन करावे. गठन झालेल्या कमिट्यांची तालुकाध्यक्षांनी बैठक घेऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पक्षाचे कार्य पोचले पाहिजे.
यावेळी माजी आ.उदेसिंग पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,मोहन शेवाळे ,बी.के पाडवी,युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे गटनेते पोपटराव सोनवणे, युवा नेते राऊ मोरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड दानिश पठाण,नगरसेवक इकबाल शेख,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी जोशी,तालुकाध्यक्ष माधव पाटील,शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, सीमा सोनगिरे तसेच जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गणातील पक्षाचे उमेदवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
ना.पाटील पुढे म्हणाले, बुथ कमिटीचे गठन केल्यास पक्षाला अधिकाधिक फायदा होईल.बुथ कमिटी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्या गटात व गणात कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. बूथ कमिटीच्या माध्यमातून संघटना जिवंत राहत असते. पदाधिकाऱ्यांनी बुथवर जाऊन कार्यकर्ते कोठे कमी पडत आहेत याचे निरीक्षण करावे.
बैठकीत प्रास्ताविक करतांना जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले, पोटनिवडणुकीत सात जणांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. सर्व गट व गणात ग्रामस्थांकडून उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक उमेदवार विजय होतील असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.