नंदुरबार | प्रतिनिधी
शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ (बी) दुरुस्ती करण्याच्या कामासाठी केंद्र शासनाने तत्वत: मंजूरी दिली आहे. नंदुरबार ते वाकाचार रस्त्याच्या कामाला येत्या १५ ते २० दिवसात व नवापूर चौफुली ते सी.बी.पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली आहे.
शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी तात्काळ मंजूरी मिळावी यासाठी खा.डॉ.हीना गावित यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, भाजपा नेते विक्रांत मोरे यांनी देखील पत्रकार परिषद घेवून तात्काळ दुरुस्ती न झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. यासह विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन देखील केले होते. यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेवून नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांनी पाठपुरावा केल्यानंतर शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती करण्याच्या कामासाठी केंद्र शासनाने तत्वत: मंजूरी दिली आहे.
तसेच याच महामार्गावरील नंदुरबार ते तळोदा या सुमारे २९ कि.मी.अंतराच्या रस्त्याच्या कॉँक्रीट चौपदरीकरणासाठी लवकरच रस्ते मंत्रालयाकडून मंजूरी मिळणार असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी म्हटले आहे. याशिवाय नवापूर चौफुली ते सी.बी.पेट्रोल पंप या आठ कि.मी.रस्त्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे. तसेच सुदर्शन पेट्रोल पंप ते अंतुर्ली या ११ कि.मी.अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २० ते २५ दिवसात सुरुवात होणार आहे.
तर सारंगखेडा ते शहादा या १४ कि.मी.रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण निविदा प्रक्रिया प्रगतीत असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली आहे.सदर रस्त्यांचा दुरुस्तीचा विषय हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. यासाठी खा.डॉ.हीना गावित यांनी पाठपुरावा केल्याने लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.








