नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रातील १६ आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त जिल्ह्यातील कार्यरत भरारी (२८१) पथकाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा विशेष बाब म्हणुन नियमित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.
याबाबत आ.आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की,नंदुरबार जिल्ह्या सह राज्यातील १६ आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात नवसंजीवनी योजने अंतर्गत गेल्या २० वर्षापासून मानसेवी वैद्यकीय अधिकारी अल्प मानधनावर अहोरात्र आरोग्य सेवा देत आहेत. कोविड-१९ च्या महामारीमध्ये देखील प्राधान्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.
आरोग्य सेवेचे आयुक्त यांनी मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांचा समावेशनाचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. आरोग्य विभागात जवळपास ४०० गट-ब वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. याबाबत शासनाने दखल घेवून आदिवासी भागात गेल्या १५ ते २० वर्षापासून अल्पमानधनावर वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट-ब संवत रिक्त पदावर विशेष बाब म्हणून मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे (भरारी पथक) सेवासमावेशन करण्याबाबत आदेश व्हावेत यासाठी संबंधित मंत्री, सचिव व अधिकारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक लावून मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांना न्याय मिळवून दयावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आमश्या पाडवी यांनी केली आहे.