नंदुरबार l प्रतिनिधी
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशन गुजरात द्वारा आयोजित इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन आयोजित करण्यात येते याची नोंडेल एजन्सी म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर ही आहे.
गेल्या महिन्यात राज्य स्तरीय इन्स्पायर अवॉर्ड ऑनलाइन पद्धतीने प्रदर्शन भरविण्यात आले होते त्यात नंदुरबार जिल्ह्यातून श्रॉफ हायस्कूलचा विद्यार्थी दीप योगेश पाटील यांच्या लेबर्स फ्रेंड नावाच्या उपकरणाची राज्यस्तरावर क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. चेतना दिनेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर उपकरण तयार करताना डोक्यावर ओझे वाहणाऱ्या मजुरांचा, डोक्यावर ओझे ठेवून विक्री करणाऱ्यांचा तसेच घरातील महिला हिला भरलेले सिलेंडर उचलण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा विचार करण्यात आलेला आहे.हे उपकरण तयार करताना अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसेच नंदुरबार येथील नामांकित अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सुनील पाटील यांची भेट घेऊन, अशाप्रकारे ओझी उचलल्यामुळे होणाऱ्या पाठीमागील हाडांच्या तक्रारी समजून घेतल्या व त्यावर उपाय म्हणून सरळ डोक्यावर ओझे न उचलता त्या ओझ्या चे वजन खांद्यावर तसेच कमरेवर विभागले जाऊन हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला.
सदर उपकरणात तीन मॉडेलचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या उपकरणात वजन डोक्यापासून वरती राहील व ती व्यक्ती दोन्ही हातने रॉड धरून चालू शकेल अशा पद्धतीने योजना करण्यात आलेली आहे, जेणेकरून हे वजन खांद्यांवर येईल व वजन उचलणाऱ्या व्यक्तीला डोक्यावर कुठलाही त्रास जाणवणार नाही.
यातील दुसरे मॉडेल असे बनवले आहे की थोडे वजन खांद्यावर व थोडे वजन कमरेवर येईल आणि हात सुद्धा मोकळे राहतील.
तिसरे मॉडेल हे खास महिलांसाठी बनवले आहे. या मॉडेलमध्ये चाकांची हाताने ओढता येईल अशी एक गाडी बनवली असून तिला एक हूक लावलेला आहे जेणेकरून या हुक मध्ये सिलेंडरची रिंग अडकवली की ते सिलेंडर या गाडीवर ठेवता येते व ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. याचा उपयोग गाडीमधून सिलेंडर घरापर्यंत आणणाऱ्या सिलेंडर वाहकाला सुद्धा होणार आहे.
या सर्व कारणांमुळे मार्गदर्शक शिक्षिका चेतना पाटील यांनी या उपकरणाला कामगारांचा मित्र असे नाव दिले आहे.विद्यार्थी दीप योगेश पाटील व मार्गदर्शक शिक्षिका चेतना पाटील यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन ॲड.रमणभाई शाह, संस्थेचे सचिव डॉ. योगेश देसाई, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, उप मुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया व जगदीश पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी
यशस्वी विद्यार्थी दीप योगेश पाटील व त्याच्या मार्गदर्शिका चेतना पाटील यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.