नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गोंधळी गल्ली येथे एकास फायनान्स कंपनीचे लोन व वाढीव लोन मंजूर करुन देण्याचे आमीष दाखवून ८३ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील गोंधळी गल्ली येथील राजेश रमेश वळवी यांना संदिप सुरेश चव्हाण, तेजस्विनी राजेद्र पारोळेकर व रोहन भिमराव बोरसे यांनी संगनमत करुन इंडिया बुल्स फायनान्स कंपनीचे लोन व वाढवी लोन मंजूर करण्याचे आमीष दाखविले. लोन व वाढीव लोन मंजूर करण्यासाठी राजेश वळवी यांच्याकडून प्रोसेसिंग फी व कागदपत्र हाताळणी फी अशी ८३ हजार रुपये घेतले. तसेच तिघांनी लोन व वाढीव लोन मंजूर न करता राजेश वळवी यांची फसवणूक केली.
याबाबत राजेश वळवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, १२० ब, ५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे करीत आहेत.