नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील रामपुर येथे झालेल्या घरकुल घोटाळ्याची व संबंधित प्रकरणात दोषींना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच इतरांच्या भ्रष्ट कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दिले आहेत. विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती आ.आमश्या पाडवी यांनी दिली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील घरकुल घोटाळ्यात बुडालेल्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभय देऊन त्यांच्या कृती कडे हेतु पुरस्कर दुर्लक्ष केले त्यामुळे तालुक्यातील आदिवासी अशिक्षित लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झाला याबाबत विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली होती.
रामपुर येथील घरकुल अनुदान वाटप करतांना मूळ लाभार्थी यांची यादी बदलून तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी अक्कलकुवा पंचायत समितीतील इतर अधिकाऱ्यां समवेत संगनमत करुन इतर व्यक्तींची नावे त्यात समाविष्ट केली व त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली. ही बाब आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार अर्जाच्या माध्यमातून ९ जुलै २०२० रोजी निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने प्रस्तावित झालेल्या चौकशी अंती आ.पाडवी यांनी निदर्शनास आणुन दिलेली बाब खरी असून अनियमितता झाली असल्याचे सिद्ध झाले. इतर व्यक्तींच्या नावे जमा झालेली रक्कम ही मूळ लाभार्थी यांना अद्याप पर्यंत न देता संबंधित लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे तक्रार केल्या तारखे पासून सुमारे २.५ वर्षा नंतर आ.पाडवी यांना दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी अवगत करण्यात आले.
परंतु या सर्व प्रक्रियेत लाभार्थी यादी फेरफार करणारे ग्रुप ग्रामपंचायत रामपूर येथील तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांचे बाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आले ही बाब मु. का. अ. रघुनाथ गावडे यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिली व कार्यवाहीत होत असलेल्या दिरंगाई बाबत देखील अवगत केले परंतु त्यांनी या विषयाकडे कोणत्याही गांभीर्याने न बघता चालढकल केली.
अतिदुर्गम भागातील गरीब आदिवासी लाभार्थ्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेत त्यांना अनुज्ञेय असलेले घरकुल अनुदानाची यादी बदलून इतर तोतया व्यक्तींची नावे टाकून अनुदान लाटु पाहणाऱ्या व सुमारे २.५ वर्ष मूळ लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणारे तत्कालीन ग्रामसेवक,सरपंच, रोजगार सेवक तसेच इतर अधिकाऱ्यांवर दोष सिद्ध होऊन देखील फौजदारी व आर्थिक अनियमितते बाबत गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठ चालढकल केली.
तसेच अक्कलकुवा पंचायत समिती मधील तत्कालीन गटविकास अधिकारी सी.के.माळी, नंदकिशोर सुर्यवंशी व आता कार्यरत असलेले महेश पोतदार यांनी देखील या कृती कडे पुर्णतः दुर्लक्ष केले. त्या अनुषंगाने आमदार आमश्या पाडवी यांनी सदर बाब राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रारी द्वारे सांगितली होती.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेत अनेक नियमबाह्य कामे करुन सामान्य जनतेचे नुकसान केले आहे.तसेच मु.का.अ.रघुनाथ गावडे यांनी प्रशासकीय कारभार करीत असतांना जिल्ह्यात पात्र व वरिष्ठ अधिकारी असतांना जिल्ह्यातील अनेक उच्च पदस्थं आस्थापनांवर पात्रता नसलेले कनिष्ठ व भ्रष्ट अधिकाऱ्यांना आर्थिक व्यवहार करुन नियम बाह्य बसविले त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यांनी भ्रष्टाचाराला खत पाणी घातले.त्यामुळे आमदार आमश्या पाडवी यांच्या तक्रारी वरुन अतिरिक्त मुख्य सचिव यांनी रामपुर घरकुल घोटाळा तसेच इतर व्यवहारां बाबत संबंधित अधिकारी व इतरांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबत आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबत माहिती दिली आहे.