नंदूरबार l प्रतिनिधी
बँकांच्या ठिबक सिंचन व पिक कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय शेतकऱ्याने किटक नाशक विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुःखद घटना नंदूरबार तालुक्यातील घोटाणे येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील घोटाणे येथील शेतकरी विश्वनाथ आत्माराम धनगर ( वय 45 ) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडीया बँक शाखा नंदुरबार या बँकेचे ठिबक सिंचन व पिक कर्ज घेतले होते.
सततच्या नापीक व अवकाळी पावसामुळे त्यांनी 13 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्वताचे शेतात पिकावर फवारणी करण्याचे किटक नाशक विषारी औषध प्राशन केल्याने ते बेशुध्द झाले होते. त्यांना प्रथम प्रा. आ. केंद्र रनाळे व त्यानंतर अधिक औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल केले 13 मार्च 2023 रोजी विश्वनाथ आत्माराम धनगर यांच्या वर औषधोपचार सुरू असतांना डॉ. संजय पटले यांनी रात्री १० .४५ वाजता मृत घोषित केले.
याप्रकरणी तात्या संतोष धनगर रा. घोटाणे ता. जि. नंदुरबार यांच्या खबरी वरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना आनंद मोरे करीत आहेत.