नंदुरबार | प्रतिनिधी
येथील तालुका पोलीस ठाण्याजवळ घडलेला दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल तालुक्यातील भालेर वासीयांनी जिल्हा पोलीसांचा नागरी सत्कार केला.
तालुक्यातील भालेर येथील सुनिल गंगाराम पाटील व त्यांचे भाऊ हंसराज दगाजी पाटील गुजरात राज्यातील कडी येथे कापूस विकून दि. १० मार्च २०२३ रोजीच्या रात्री ०१.३० वा. सुमारास दुचाकीने त्यांच्या घरी जात असतांना नंदुरबार शहरातील भालेर रोडचे होळ गावाकडे जाणार्या फाटयाजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर पांढर्या रंगाचे चारचाकी वाहन आडवे लावून मिरचीपूड भिरकावून १३ लाख ९४ हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतली. याबबत सुनिल गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९४, ३४ सह आर्म ऍक़्ट ३/२५ प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, त्यांच्या पथकाने ३० तासात उमेश आत्माराम पाटील वय-४२ रा. जुनवणे ता.जि. धुळे, चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील वय-४१, सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील वय-२४, दीपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील वय-२६ तिन्ही रा.धामणगांव ता.जि.धुळे, राहुल बळीराम भोई वय-२५ रा. शिरुड ता.जि. धुळे यांना धुळे येथून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १३ लाख २६ हजार ५४० रुपये रोख, २५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, १२०० रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस, २०० रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू, ५० हजार रुपये किमतीचे ०५ विविध कंपनीचे मोबाईल व गुन्हा करतेवेळी वापरलेले ७ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकुण २१ लाख ०२ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणणार्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी यांचे ग्रामपंचायत चौक भालेर येथे आगमन झाल्यावर भारतीय पंरपरा व रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे औक्षण करण्यात आले.
त्यानंतर भालेर, तिशी, नगांव यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पारंपारीक वाद्यांच्या गजरात स्वागत करुन त्यांची मिरवणूक काढली.
गुन्हा उघडकीस आणला म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. यावेळी भालेर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.शोभाबाई पाटील, उपसरपंच गजानन पाटील, नगांव गावाचे सरपंच सौ.रत्नाबाई धनगर, तिशी गावाचे सरपंच दिलीप पाटील, भास्करराव पाटील, भिका पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.