नंदुरबार | प्रतिनिधी
भालेर येथील दोघा शेतकर्यांचे कापुस विक्रीच १३ लाख ९४ हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले होते.याप्रकरणी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस विभागाने गुन्ह्यातील सर्व ५ संशयीत आरोपींना ३० तासात धुळे जिल्ह्यातून पकडले. तसेच त्यांच्याकडून शेतकरी बांधवांकडून चोरी केलेले १३ लाख २६ हजार रुपये व १ बंदुक हस्तगत केल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.कृतज्ञता म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करणे कर्तव्य आहे अशा भावनेने भालेर पंचक्रोशीतील नागरीकांसह सर्व पक्षातर्फे पोलीस दलाचा आज भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्याज आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हंसराज दगाजी पाटील दोन्ही रा. भालेर ता. जि. नंदुरबार हे दोन्ही शेतकरी त्यांचा कापूस गुजरात राज्यातील कडी येथे विकुन१० मार्च रोजी रात्री १.३० वा. सुमारास दुचाकीने त्यांच्या घरी जात असतांना अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या डोळ्यात मिरची फेकून त्यांच्याजवळील १३ लाख ९४ हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
शेतकर्यांसोबत झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्वतः सुत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करून गुन्ह्यातील सर्व ५ संशयीत आरोपींना ३० तासात धुळे जिल्ह्यातून पकडले. तसेच त्यांच्याकडून शेतकरी बांधवांकडून चोरी केलेले १३ लाख २६ हजार रुपये व १ बंदुक हस्तगत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्ह्यातील फिर्यादी सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हंसराज दगाजी पाटील व त्यांचे कुटुंबीय यांना दिलेले आश्वासन पुर्ण केले.
ज्या पोलीस अधिकारी कर्मचार्यांनी ही मोहीम यशस्वी केली त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करणे कर्तव्य आहे अशा भावनेन सर्व शेतकरी बांधव व नागरिक व सर्व पक्षीयांतर्फे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व पोलीस दलाचा आज १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेला ग्रामपंचायत चौक, भालेर ता. जि. नंदुरबार येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव तमाम सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक आणि भालेर, तिशी, नगांव ग्रामस्थ यांच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक व त्यांच्या पथकाचा नागरी सत्कार समारंभ आयोजीत केला आहे. तरी सर्व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागरीक व सत्कार समितीने केला आहे.








