नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, हवामान पुन्हा एकदा बदल होत असून कमी दाबाचे पट्टे राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १७ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडात होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ ते ३६ आणि किमान तापमानात १७ ते १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पक्वता अवस्थेत असलेल्या मका, हरभरा, ज्वारी, गहु, भाजीपाला इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकुण ठेवावे. शेतात काढून ठेवलेल्या धान्यांना ताडपत्रीने झाकून ठेवावे. काढणीस आलेली पपई, केळीची फळे तोडून ठेवावीत. वादळी वा-यामुळे झाडे पडू नये म्हणून भाजीपाला तसेच फळपिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी.
तसेच पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या भिजू नयेत यासाठी सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवाव्यात असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, नंदुरबार यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे.








