नंदूरबार l प्रतिनिधी
महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच आरोग्य संदर्भातील काही अडचणी आल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे प्रतिपादन गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात आयोजित महिला दिन या प्रसंगी आधार हॉस्पिटलचे संचालिका डॉ. अनिता ठाकरे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ.अनिता ठाकरे व प्रा. वैशाली शेवाळे प्राचार्य औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय नंदुरबार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत. महिला दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील युवती सभेचे उद्घाटनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी होते. डॉ. ठाकरे यांनी आपल्या संभाषणातून महिलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. महिलांच्या जीवनातील वयानुसार विविध टप्प्यांवर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या अडचणींमध्ये कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. बालपण, किशोरवयीन अवस्था, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर लैगिंक आयुष्य, गरोदर अवस्था, बाळंतपण या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्यात. गर्भ अवस्था व बाळांतपण यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात व त्यावर काय उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भातही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्रा. वैशाली शेवाळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची विविध क्षेत्रातील भरारी अधोरेखित केली. तसेच महिलांना सन्मान प्राप्त करून देणाऱ्या पुरुषांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. मुलींनी महाविद्यालयीन जीवन जगत असताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे या संदर्भातही त्यांनी विवेचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्रा डॉ महेंद्र रघुवंशी यांनी शैक्षणिक क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींचा प्रगती आलेख चढता आहे असे नमूद केले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी महाविद्यालयात काही अडचणी आल्यास थेट प्राचार्यांकडे निसंकोचपणे यावे किंवा महिला प्राध्यापिकांशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
सामाजिक जीवनात महिलांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महिला दिनी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एन जे सोमानी तसेच मराठी विभागाचे विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. विजया पाटील मंचवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभेच्या समन्वयक प्रा. संगीता पिंपरे, सूत्रसंचालन प्रा. वैशाली जगताप, तर आभार रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा जयश्री नायिका यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश देवरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. उपेंद्र धगधगे, प्रा जितेंद्र पाटील व वरिष्ठ स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.








