मोलगी । प्रतिनिधी
१८६७ पासुन परंपरा असलेल्या धडगाव शहारात सोमवारी आठवडे बाजारानिर्मित्त भोंग-या बाजार भरवण्यात आला होता. बाजारासाठी दुर्गम भागातून हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावत सांस्कृतिक पथसंचलनात सहभागी होऊन आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या घरापासून सुरु झालेल्या सांस्कृतिक शोभायात्रेचा दुपारी समारोप करण्यात आला .ढोल, मांदल,ढोलकी,पेपा-या, तुतळ्या आणि बासुरीच्या सुरांमुळे धडगाव परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. विविध वाद्यातील घेरनृत्य करत रंगत आणली होती. भोंगा-या बाजारातून दिवसभरात पूजा साहित्य तसेच विविध वस्तूंची खरेदी करण्यात आली. थाटात निघाली शोभायात्रा.

पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या घरापासून सकाळी ११.वाजेपासून मानाच्या भोंग-या मिरवणुकील प्रारंभ करण्यात आला. पराडके कुटुंबातील पाचव्या पिढीचे पोलीस पाटील प्रतिनिधी असलेले भिमसिंग पराडके यांचे खापर पणजोबा मोल्या पराडके यांनी १८६७ मध्ये पहिल्यांदा धडगावात भोंग-या बाजार भरवल्याची माहिती आहे. त्यांच्या नंतर साठ्या पराडके, परबा पराडके, भामटा पराडके यांनी ही परंपरा ठेवली होती. पराडके कुटुंबाचा हा वारसा पोलीस पाटील भिमसिंग पराडके हे २९.वर्षा पासून अधिक काळापासून चालवत आहेत. सोमवारी त्याच्या घरी आदिवासींच्या विविध पारंपरिक ठेवणीच्या शस्त्रांचे पूजन करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला होता. यात शेकडोंच्या संख्येने आदिवासी बाधंव सहभागी झाले.

शहरातील विविध मार्गांवर उत्साह
भोंग-या बाजाराचे मानकरी पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या नेतृत्वात सुरुवात झालेली शोभायात्रा जुने धडगाव मार्गाने विश्रामगृह, हनुमान मंदिर मार्गाने धडगाव पोलीस स्टेशन,रुपसिंग तडवी यांचे निवासस्थान, फाॅरेस्ट कार्यालय ,पाटीलबाबा चौक या मार्गाने मेन रोडवरील मुख्य बाजारपेठेततून पुन्हा विश्रामगृहहाकडे व पोलीस पाटील यांच्या घराकडे परतली. या मिरवणुकीत पारंपरिक वांद्याच्या तालावर आदिवासी बांधवांनी नृत्य केले. भोंग-या बाजारात पारंपरिक पोशाखतील महिला, युवती, युवक, पुरुष आणि ज्येष्ठ सहभागी झाले होते. सकाळी ११.वाजेपासून प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीचा समारोप दुपारी तीन वाजता पोलीस पाटील भिमसिंग पराडके निवासस्थानी करण्यात आला.

शोभायात्रेत माजी सभापती जामसिंग पराडके,, सभापती गणेश पराडके , महेश पराडके विजयसिंग पराडके, रवि पराडके,आमदार आमशादादा पाडवी ,पिंटू वळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी झाले होते. सकाळपासून बाजारपेठेत गूळ, दाळ्या,संत्रा,हारकंगण,होळी पूजनासाठी लागणारे साहित्य, खोबरे, शोभेचा कागद आणि कपडे खरेदी साठी शेकडो आदिवासी बांधव दुर्गम भागातून धडगाव येथे आले होते. बाजारपेठेत स्थानिक व्यापा-यांसोबतच शहादा आणि अक्कलकुवा येथूनही फळ व्यापारी सहभागी झाले होते. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा धडगावच्या भोंग-या बाजारात मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. यातुन दिवसभरात हजारोंची उलाढाल झाली.

दागिन्यांची खरेदी वाढली
होळीच्या पाश्वभूमीवर धडगाव आणि तळोदा सराफ व्यावसायिकांकडे चांदीचे घडीव दागिने बनवून घेण्यासाठी आदिवासी महिला गर्दी करु लागल्या आहेत. सोमवारी धडगावच्या भोंग-या बाजारात चांदीचे दागिने खरेदी -विक्रीतून किमान पाच लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आले आहे. येथील महिलांकडून तळोदा येथील व्यावसायिकांना दागिन्यांची ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे.

ढोलाची थापही न्यारी
दांडी पौर्णिममेनंतर महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या होळीपर्यत आदिवासी बांधव होळीव्यतिरिक्त इतर कोणतेही खकार्यक्रम करत नाहीत.यादरम्यान होणारा भोंग-या अर्थात मेला सर्वाधिक पसंतीचा असतो. या मेल्यात ढोल वादनाची स्पर्धा घेतली जाते. धडगाव येतील मानसिंग स्टेडियम (आमराई) येथे सोमवारी भोंग-या दरम्यान ढोल स्पर्धा सुरू होती. यात ४०.च्या जवळपास ढोल वादक सहभागी झाले होते. त्याच्याकढून विविध प्रकारे सजवलेले ढोल बांधलेल्या चालींवर वाजवले जात होते. या वादनाची पाहणी करणारे पाच ते सात तज्ञ ढोल वादकांमध्ये फिरत होते. विजेत्या स्पर्घकाला गावोगावी होणार्या होळीमध्ये ढोल वादनाचा प्रथम मान हे बक्षीस देण्याची परंपरा असल्याने तज्ञ परीक्षक बारकाईने ढोलवर पडणा-या प्रत्येक थापंचे श्रवण करत होते. रंगतदार अशा या स्पर्धेचा उशिरापर्यंत विजेता ठरलेल्या नव्हता. १२.तासांपेक्षा अधिक काळ ढोल वादन सुरु होते.








