नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध समाजातील सर्व महिला मंडळ, संघटनांचा एकत्रित असा नारीशक्ती निर्धार महिला मेळावा उद्या दि.८ मार्च २०२३ कन्यादान मंगल कार्यालय येथे दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत होईल. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह हृदयरोग व कॅन्सर या आजारांविषयी तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती मेळाव्याच्या संयोजिका डॉ.तेजल चौधरी यांनी दिली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला व सामाजिक संघटनांचा संयुक्तपणे नारीशक्ती निर्धार महिला मेळावा घेण्यात येतो. या मेळाव्याचे हे नववे वर्ष आहे. कोरोनानंतर सर्व समाज घटकांना आरोग्याविषयी समस्या सतावित आहेत. त्यासाठी हृदयरोग या आजारावर हृदयरोग तज्ञ नाशिक डॉ.प्रसाद अंधारे हे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कॅन्सर हा महिलांना भेडसावणारा आजार आहे. यावेळी गर्भाशय कॅस्नरची तपासणी नाममात्र दरात करण्यात येणार आहेत.
सदर तपासणीचे कुपन मेळाव्यात महिलांना वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच महिलांना समाजातील पारंपारिक सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक नृत्यविष्काराचे आयोजनकरण्यात आले आहे. तसेच विद्यार्थीनी विविध ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहेत. तरी महिलांसाठी सांस्कृतिक व आरोग्याची मेजवानी ठरणार्या मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन मेळाव्याच्या संयोजिका डॉ.तेजल विशाल चौधरी, लायन्स फेमिना क्लब अध्यक्षा शितल चौधरी, हिना रघुवंशी, प्रियंका सोनार, मिनल म्हसावदकर, अपर्णा पाटील, सुप्रिया कोतवाल, गायत्री पाटील यांनी केले आहे.








