नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे ८ वर्षापासून फरार असलेल्या संशयीत आरोपीताकडून ५ लाख ५५ हजार ६८० रुपये किमतीच्या अवैध दारूसह २९ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे.या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.४ मार्च २०२३ रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथील रुस्तम गावीत हा चारचाकी वाहनांमधून महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अवैध दारुची चोरटी वाहतूक करणार आहे. तसेच त्यांच्यावर यापुर्वी देखील नवापूर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये २ व दारुबंदी कायद्यान्वये असे एकुण ३ गुन्हे दाखल असून गुन्हा घडल्यापासून रुस्तम गावीत हा फरार होता, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. त्यांनी नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथे आरोपीच्या घराच्या आजु-बाजुला स्थानिक नागरिकांच्या वेशभूषेत वेशांतर करुन सापळा रचला. तसेच संशयीत आरोपी रुस्तम जमनादास गावीत याच्या घरामध्ये येणार्या जाणार्या लोकांवर पाळत ठेवली. त्याच दरम्यान पथकाने रुस्तम जमनादास गावीत याचे घरावर छापा टाकला असता एक इसम पोलीसांना पाहून पळू लागला, नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रुस्तम जमनादास गावीत रा. पिपलकुवा ता. सोनगढ जि. तापी गुजरात ह.मु. लक्कडकोट ता. नवापूर यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभे ३ चारचाकी वाहन उभे दिसले. म्हणून पथकांनी वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.
२ लाख २५ हजार १२० रुपये किमतीचे देशी दारु सुगंधी संत्राचे एकुण ६७ खोके, एका खोक्यामध्ये १८० एम.एल.चे ४८ बाटल्या, अशा एकुण ३२१६ नग काचेच्या बाटल्या.१ लाख १४ हजार ८०० रुपये किमतीची डीएसपी ब्ल्याक डिलक्स विस्की च्या १८० ३५० व ७५० एम. एल. च्या एकुण ४६९ बाटल्या. ५३ हजार ७६० किमतीचे इंम्पेरीयल ब्लु हॅन्ड पीकेड ग्रेन विस्कीचे एकुण १४ खोके,एका खोक्यामध्ये १८० एम.एल.चे ४८ बाटल्या, अशा एकुण ६७२ नग काचेच्या बाटल्या. ६७ हजार २०० रुपये किमतीची टुबोर्ग प्रिमीयर बियरचे एकुण २० खोके, एका खोक्यामध्ये ५०० एम.एल.चे २४ नग पत्रटी टिन असे एकुण ४८० नग पत्रटी टिन, ५९ हजार २८० रुपये किमतीची हॅवर्ड ५००० प्रिमीयर स्ट्रॉंग बियरचे एकुण १९ खोके,एका खोक्यामध्ये ५०० एम.एल. चे २४ नग पत्रटी टिन असे एकुण ४५६ नग पत्री टिन. २१ हजार ६०० किमतीचे रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट विस्कीचे एकुण २ खोके, एका खोक्यामध्ये ३७५ एम. एल. चे २४ बाटल्या, अशा एकुण ४८ नग काचेच्या बाटल्या. १३ हजार ९२० रुपये किंमतीची किंगफिशर बियरचे एकुण ७ खोके एका खोक्यामध्ये ५०० एम.एल.चे २४ नग पत्रटी टिन असे एकुण १२० नग पत्री टिन.२४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ३ चारचाकी वाहन त्यात महिंद्रा बोलेरो वाहन (क्र.जिजे. २६ टि.६०४६), टोयाटो इनोव्हा वाहन (क्र.जि.जे-१९,एएफ-३६९५), ह्युंडाई क्रेटा बिना नंबरची, हिरो होंडा करीझ्मा दुचाकी मोटार सायकल (क्र.जि.जे-२६, ई- ०२९७), ज्युपीटर स्कुटी विना नंबरची, असा एकुण २९ लाख ९५ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन रुस्तम जमनादास गावीत याच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयीत आरोपी रुस्तम जमनादास गावीत याचे मागे असलेल्या तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणार्यांची गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा. पोलीस उप निरीक्षक गुमानसिंग पाडवी, पोलीस हवालदार दादाभाई वाघ, दिनेश वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, प्रेमचंद जाधव, पोलीस अंमलदार दिनेश बावीस्कर, गणेश बच्छे, श्याम पेंढारे, रणजित महाले, किशोर वळवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे व जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.








