नंदुरबार l प्रतिनिधी
निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी केवळ शेणाच्या गोवऱ्या,कापडी चिंध्यांचा वापर करून लाकूडरहित पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याची परंपरा शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाने यंदाही राखली कायम आहे.इको फ्रेंडली होळीचे मंडळाचे यंदा 33 वे वर्ष आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना अनेक हौशी तरुण दरवर्षी होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करतात मात्र नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे 1990 पासून लाकूड रहित होळी साजरी करत पर्यावरण रक्षणासाठी मंडळातर्फे गेल्या 33 वर्षांपासून उपक्रम सुरू आहे. मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक स्व.विठ्ठलराव हिरणवाळे यांच्या प्रेरणेने शेणाच्या गोवऱ्या जुन्या नव्या कपड्याच्या चिंध्यांचा वापर करण्यात येत आहे.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी पर्यावरणपूरक होळी साजरीी करण्यात येते.या होळीद्वारे सामाजिक संदेश दिला जातो.दरवर्षी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात होळी प्रज्वलित होण्यापूर्वी परिसरातील सुवासिनी महिला आणि बेटी बचाव अभियान अंतर्गत शालेय तसेच महाविद्यालयीन युवतींच्या हस्ते तुळशी, आंबा, कडुलिंब, पेरू आदी वृक्षांची विधिवत पूजा केलीी जाते.त्यानंतर या रोपांची लागवड करून झाडे लावा.. झाडे जगवा असा संदेश देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
शतकाची परंपरा असलेल्या नंदनगरीतील ऐतिहासिक बालाजी वाडा येथील मानाच्या होळीतून मंडळाचे कार्यकर्ते गोपाल हिरणवाळे मशाल पेटवून आणतात.त्यानंतर बालवीर चौकातील होळी त्या मशालीच्या सहाय्याने प्रज्वलित येते.
नंदुरबार जिल्ह्यात एकमेव शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात येत आहे.
या उपक्रमाची दखल घेऊन निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेंतर्गत 2019 मध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यातत आले आहे.
जलबचतीचे प्रबोधन
धुलीवंदन किंवा रंगपंचमीला घातक व रासायनिक रंगाचा वापर टाळला जातो.धुलीवंदन निमित्त होणारी पाण्याची नासाडी थांबवून
जलबचतीचे महत्त्व दरवर्षी मंडळातर्फे सांगण्यात येत आहे.
व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी गुटख्याच्या पुडया आणि दहशतवाद, भ्रष्टाचार आदी फलकांचे प्रतिकात्मक दहन करण्यात येते. या राष्ट्रीय उपक्रमात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्यासह जेष्ठ सल्लागार जी.एस.गवळी,सेवानिवृत्त बी.डि.गोसावी, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, संजय चौधरी, कैलास ढोले, भास्कर रामोळे, अंकुश ढोले, सदाशिव गवळी, काशिनाथ गवळी, विशाल हिरणवाळे, धिरेन हिरणवाळे,आमेश कासार,प्रफुल्ल राजपूत,दिग्विजय रघुवंशी आदींचा सहभाग आहे.








