नंदुरबार ।प्रतिनिधी
येथील पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ व पूज्य अपरसिंध पंचायत नंदुरबार यांच्या वतीने बाबा गरीबदास मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.4 मार्च व 5 मार्च 2023 रोजी सद्गुरु महाराज बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमांचा सिंधी समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ व पूज्य अपरसिंध पंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सद्गुरु महाराज बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव साजरा करण्यात येत आहे. सिंधी समाजातील विविध संतांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होणार असून इंदौर येथील खा.शंकरलाल लालवानी, छत्तीसगड भाजपाचे प्रदेश मीडिया प्रमुख अमित चिमनानी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. दि.3 मार्च रोजी रात्री 8 वाजता अखंड पाठ व रात्री 10 वाजता हवन पुजन कार्यक्रमाने वार्षिक मेला उत्सवाला सुरुवात झाली. आज दि. 4 मार्च 2023 रोजी सकाळी आठ वाजता व सायंकाळी 5 वाजता सत्संग, प्रवचन कार्यक्रम होईल. दि. 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ध्वजवंदना दुपारी 3 वाजता शोभायात्रा रात्री 8 वाजता भोग साहिब, रात्री 2 वाजता पल्लब साहिब असे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमांसाठी इंदौर येथील खा.शंकरलाल ललवाणी यांचे दि.5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नंदुरबार शहरात आगमन होणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत खा.शंकरलाल ललवाणी यांचा जाहीर सत्कार होईल. या वार्षिक मेला उत्सवातील कार्यक्रमांना सिंधी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ व पूज्य अपरसिंध पंचायत यांनी केले आहे.








