नंदुरबार । प्रतिनिधी-
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात करण्यात आली.
नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवावी अशी संकल्पना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी मांडली होती. जनजागृती मोहीम राबवितांना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, संस्था आदी ठिकाणी जनजागृती म्हणून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, भाषण स्पर्धा, पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच त्याचप्रमाणे तरूण वयोगटातील विद्यार्थी व पालक यांचेत एकत्रित चर्चासत्र, संवादसत्राचे आयोजन करण्यात यावे. तसेच विविध नाविन्यपूर्ण योजनांचा वापर करुन अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवावे.
त्यातून घर, शाळा, परिसर, शासकीय कार्यालय, संस्था, जिल्हा व पर्यायाने राज्य अंमली पदार्थमुक्त कसे राहील याबाबत प्रयत्न करावे असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी अधीक्षकांना केले होते.
त्यानुसार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रात सर्वप्रथम अंमली पदार्थ विरोधी अभियान अभियान सुरू करून जिल्हा घटकात अभियानाची दमदार सुरुवात करण्याचा संकल्प मांडला. आज दि. १ मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी अभियानाची सुरूवात करण्यात आली.
दीपप्रज्वलन करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अंमली पदार्थांचे दुष्परीणाम व किशोरवयात या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्यास त्याचे काय फायदे होतात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी संकल्पनेची शपथ दिली. पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असतांना अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढून नवीन जीवन मिळवून दिल्याचे उदाहरण नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिले.
तरूण पिढी हे राष्ट्राचे भविष्य असून त्यांनी उज्वल भविष्यासाठी स्वतःच्या व वैयक्तीक आरोग्यासाठी अंमली पदार्थ सेवन न करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. नंदुरबार जिल्हा घटकाने २४ तासापेक्षा कमी कालावधीत प्रतिसाद देवून अंमली पदार्थ मुक्त जिल्हा अभियानाची सुरुवात केल्याबद्दल त्यांनी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे अभिनंदन केले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेला ‘से नो टू ड्रग्स’ अंमली पदार्थ मुक्त जिल्हा हा संकल्प पुढे जावो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अंमली पदार्थ विरोधी अभियानाच्या या कार्यक्रमाप्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, जी.टी. पी. महाविद्यालय, श्रॉफ हायस्कुल, एस. ए. मिशन हायस्कुल, भामरे क्लासेस, अभिनव विद्यालय, पी. जी. पब्लिक स्कुल या शाळा व महाविद्यालयांचे सुमारे १ हजार विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस निरीक्षक राहूल पवार, रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.