नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचालित श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल येथे विपनेट सायन्स क्लब इग्नाइटेड माईंड्स द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
28 फेब्रुवारी 1928 रोजी सर सी. व्ही. रमण यांनी जगप्रसिद्ध रमण इफेक्ट चा शोध लावला व या दिवसाचे औचित्य साधून देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी जी 20 संमेलनाचे अध्यक्ष पद भारताकडे आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय विज्ञान दिन “ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीइंग” या थीमखाली साजरा केला जात आहे.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह यांच्या हस्ते सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व विज्ञान शिक्षिका चेतना पाटील यांनी बनवलेल्या मॉडेलच्या सहाय्याने रिमोट कट्रोलद्वारे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत विपनेट क्लब समन्वयक राजेंद्र मराठे यांनी सर सी. व्हि. रमण यांच्या रमण इफेक्ट्स चे महत्व तसेच मानवतेला भेडसावणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वैज्ञानिक सहकार्य आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी शाळेचे राज्यस्तरावर निवड झालेले दीप पाटील याचे लेबर्स फ्रेंड, संचीता पाटील हीचे मॉडर्न सिस्टिम्स फॉर वेहीकल्स, प्रसन्न दाऊतखाने याचे द ग्रोथ ऑफ स्पिरुलिना इन फोटो बायोरिॲक्टर् , प्रणील भावसार याचे ग्रीन एनर्जी वायरलेस इ चार्जिंग स्टेशन यांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी विविध शास्त्रज्ञांच्या जीवन चरित्रांबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना समजावल्या. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक समजावून दिला. हे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे असल्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी विज्ञान खूप आवश्यक आहे या गोष्टीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते. महेश पाटील, मृणाल देवकर, विवेक राजपूत तसेच सर्व विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले.








