तळोदा l प्रतिनिधी
रानभाज्या या निसर्गाची देण आहे. अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून त्या पौष्टिक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार आहेत. असे प्रतिपादन शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी तळोदा येथे झालेल्या रानभाज्या महोत्सवात केले.
तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि रेवा बहुद्देशीय सामाजिक संस्था रेवानगर ता.तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० पेक्षा अधिक विविध रानभाज्यांचे स्टॉल आदिवासी महिलांनी लावले होते. या कार्यक्रमाला मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, प्रमुख अतिथी आ.राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, सिनेट सदस्य मनीष जोशी, नगरसेवक योगेश पाडवी, किसान संघाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र राजपूत, दिनेश खरात, दिनेश नाईक, कृषी विज्ञान केंद्राचे दहातोंडे,यशवत पाडवी, आदी उपस्थित होते. आ.पाडवी पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने आठवड्यात किमान दोन वेळा या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.तसेच पवार यांच्या बारीपाडा या गावचे कौतुक केले. तस काम तळोदा तालुक्यातही सुरू करण्यात येईल असं या प्रसंगी त्यांनी सांगितले. उदघाटनपर चैत्राम आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्या अवती भोवती भरपूर नैसर्गिक संसाधन आहेत. स्थानिक साधन संपत्तीचा उपयोग करून विकास साधता येईल. आम्ही गाव संघटित केलं. जर गाव संघटित झालं तर खूप काही होऊ शकत. आम्ही ४८५ बांध बांधून गावातून वाहून जाणारे पाणी अडवलं. सामुदायिक वनसंवर्धनाचा प्रयोग ४५ गावांना सुरू केला. जर गाव संघटित झालं तर वन संवर्धन होईल असे ते म्हणाले. डॉ टाटिया यांनी म्हटले की, आजच्या फास्ट फूड च्या जमान्यात जे खायला नको ते आपण खातो व आजारी पडतो जे खायला हवं ते रानभाज्या , पालेभाज्या इ. खात नाही त्यामुळे डायबिटीस, हार्टअटॅक व इतर आजारांना आपणच निमंत्रण देतो.या रानभाज्यांचे जर आपण सेवन केले तर आपण आजारी पडणार नाही.असे ते म्हणाले यावेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता वळवी, निशा पावरा, अँड.संजय पुराणिक, स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, न्यू-हायस्कुल चे प्राचार्य अजित टवाळे, सुधीरकुमार माळी, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश पाडवी यांनी केले तर सूत्रसंचालन पं.स.सदस्य दाज्या पावरा यांनी केले.
या महोत्सवात १५ वनधन विकास गटाच्या माध्यमातून ६० च्या वर वनभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यात बांबू कोम, तेंदू पत्ता, मतर हिंग्या, गिलके, भोपळा पाने, देशी परवड, बांबू कोम, शिरी पाला, खाटी भेंडी, कडवी भेंडी, खाटगोला भाजी, केहवानी, रसगुल्लो, माटला पालो, केहवानी, बेहरा, अंबाडी पाने व फुले यांच्यासह इतर ६० पेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्या महिलांनी मांडल्या होत्या.