अक्कलकुवा l प्रतिनिधी
दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या तक्रारीची अक्कलकुवा पोलीस स्टेशनने अद्याप पर्यंत दखल न घेतल्याच्या निषेधार्थ दि.25 फेब्रुवारी रोजी खापर चौफुली येथे आदिवासी महासंघ व इतर संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आदिवासी महासंघाच्या वतीने तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील एका गावातील मुलगी ही ,दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघुन गेली.याबाबत मुलीच्या वडीलांनी दि. 15 फेब्रुवारी रोजी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घटनेच्या अनुषंगाने तक्रार दाखल केली त्याच दिवशी मुलीचे वडील यांनी सदर मुलगीला कोराई येथील एका विशिष्ट समाजातील मुलाने त्याचा गुजरात राज्यातील पाट येथील साथीदाराच्या मदतीने पळवुन नेल्या बाबत अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सांगितले होते.
व त्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती देखील पोलिसांना दिली. मात्र घटनेच्या 8 दिवसा नंतर देखील पोलिसांनी या घटने कडे गांभीर्याने न बघता मनमानी पद्धतीने तपास रेंगाळत ठेवला.अनेक वेळा पोलिसांना तपासा बाबत विचारले असता सतत उडवा उडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे मुलीच्या सुरक्षितते बाबत ग्रामस्थांना काळजी वाटत असल्या कारणाने या घटने संदर्भात मुलाचे वडील यांना विचारुन मुलगी चा तपास करण्याची विनंती केली. मात्र मुलाचे वडीलांनी सहकार्य न करता उलट जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावले व पुन्हा विचारणा केली तर जीवे ठार मारण्यात येईल अशीही धमकी दिली असे निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनात पुढे नमुद आहे की, सदर प्रकरणात अक्कलकुवा पोलीस हे अत्यंत दुर्लक्ष करीत असुन त्यांच्या निष्काळजी पणा मुळे मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मुलीचा तपास योग्य पद्धतीने व ग्रामस्थांना विश्वासात न घेता होत असल्याने अक्कलकुवा पोलीस निरीक्षकांच्या विरोधात दि.25 फेब्रुवारी रोजी कोराई चौफुली येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर आदिवासी महासंघाचे तालुका सचिव जी.डी.पाडवी यांच्या सह तालुक्यातील सरपंच व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत.








