नंदुरबार । प्रतिनिधी
तळवे ता. तळोदा येथील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि.१४ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तळोदा येथील नारायण जगन्नाथ गायकवाड यांच्या तळोदा तालुक्यातील तळवे गावातील राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप कडीकोयंडा तोडून चोरटयांनी ८६ हजार ४५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने चोरून नेले. म्हणून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे. , अक्कलकुवा विभागाचे पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा व तळोदा पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले. दि.२० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना अक्कलकुवा गावातील सोरापाडा परिसरात राहणारा शिकलीकर तरुण अक्कलकुवा गावातील मोलगी नाका परिसरात सोन्याची लगड व चांदीचे काही दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार केले. पथकाने तात्काळ अक्कलकुवा गाठून तेथे मोलगी नाका परिसरात साध्या वेशात सापळा रचून संशयीत इसमाचा शोध घेतला असता त्याला पोलीसांनी अटक केली. दर्पनसिंग धरमसिंग शिकलीकर वय २२ रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे सोन्याची लगड व चांदीचे दागिने मिळून आले. त्याने ४ ते ५ दिवसापूर्वी तळवे येथे एका बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून सोने, चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडून १ लाख ६२ हजार ९१८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आले आहेत. दर्पनसिंग धरमसिंग शिकलीकर याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या अभिलेखाची माहिती घेतली असता, त्याच्यावर मध्य प्रदेश राज्यातील खरगोन व बडवाणी जिल्ह्यात तसेच दिल्ली येथे मालमत्तेविरुध्वे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजून आले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे.