नंदुरबार l प्रतिनिधी
शेवाळी नेत्रंग महामार्गावरील नंदुरबार शहरातील करण चौफुली ते नवापूर चौफुली पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उठक बैठक घालून आंदोलन केले.
नंदुरबार शहरातून राष्ट्रीय महामार्ग शेवाळी नेत्रांग जात असून, बायपास रस्त्यावरील करण चौफुली ते नवापूर चौफुली रस्ता दरम्यान अनेक दिवसांपासून मोठमोठी जीव घेणी खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर अनेक वेळेस अपघात होऊन काही जण जायबंदी झालेले आहेत. असे असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सततच्या दुर्लक्षामुळे वाहन चालक वैतागले आहेत. अनेक वेळेस आंदोलने, निवेदने देऊन देखील संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष नितीन जगताप व जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली जगतापवाडी चौफुली जवळ आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बघ्याच्या भूमिके विरोधात जगतापवाडी जवळील खड्ड्यांमध्ये उठक बैठक घालून आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन जगताप, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,युवक उपाध्यक्ष छोटू कुवर, राष्ट्रवादी व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव,कोषाध्यक्ष सुनील राजपूत,ग्रामपंचायत सदस्य रुपेश जगताप,तालुकाध्यक्ष प्रतीक पाटील,दिव्यांग सेल जिल्हा उपाध्यक्ष आनंदा पाटील,धनराज बच्छाव,सुमित जगताप,साहिल वंजारी,ऋषिकेश जगताप,गणेश राठोड, गुड्डू राठोड यांनी सहभाग घेतला.
नंदुरबार शहरातील वळण रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अंदाजपत्रक मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून यापूर्वीच रस्ते मंत्रालय कार्यालयात नोव्हेंबर ला सादर केले आहे.याबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. परंतु,अद्याप कामांना मंजुरी मिळालेली नाही.मंजुरी आदेश प्राप्त होताच तात्काळ खड्डे बुजवण्यात येतील असे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग,धुळे यांनी सांगितले.








