मोलगी l प्रतिनिधी
अंगणवाडी सेविकेला पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांने त्या सेविकेला नेहमीच त्रासही दिला. त्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात तेथीलच रहिवासी अलका अमिताभ वळवी ( वय ३३) ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता, पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे व विस्तार अधिकारी पंकज बोरसे यांनी तिला मानसिक त्रास दिला. एवढेच नव्हे तर गावातील लोकांना चिथावणी देत त्यांनाही त्रास द्यायला लावला.
अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास व गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ जोमा वळवी यांनी केली आहे.
अमृत आहारासाठीही खाजगी खर्च-
सेवेचा कुठलाही मोबदला मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून गरिबीशी दोन हात करणाऱ्या मयत अलका वळवी हे अंगणवाडी केंद्रातील बालकांना अमृत आहार देखील खाजगी खर्चातून पुरवठा करीत होते. अशाप्रकारे आर्थिक बोजा वाढत होता, त्यातच अधिकाऱ्याचा त्रास, अशामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे कळते.
मिटींग ठरली अखेरची-
एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मिटींग घेण्यात आली. ही मिटींग करुन गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली, त्यामुळे ही मिटींग तिच्यासाठी अखेरची ठरली.








