नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळा गावाजवळून एका ट्रकमधून काळ्या बाजारात तांदुळ विक्रीसाठी नेणाऱ्या दोघा संशयितांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडून ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचे तांदुळ व ९ लाख रुपये किंमतीचे वाहन असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . काल दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता १७ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांनी दिली .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , महेश दिगंबर सुफलकर रा.निवाली ता . जि.लातूर व लालासाहेब अंकुश कु-हाडे रा.अर्णी ता.जि.उस्मानाबाद हे दोघे जण त्यांच्या ताब्यातील मालट्रक ( क्र.एम.एच .१० एडब्ल्यू ७९ ७४ ) मधून शासकीय तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जातांना आढळून आले . नंदुरबार – दोंडाईचा रस्त्यावरील रनाळा गावाजवळ सदर वाहन अडवून तपासणी केली असता त्यात शासकीय तांदुळाच्या ५०० कट्टे आढळून आले . सदरचा ४ लाख ९ ० हजार ७२३ रुपये किंमतीचा २५३ क्विंटल शासकीय विक्रीचा तांदुळ लातूर येथून अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत होते . मात्र याबाबत पुरवठा विभाग व पोलिसांना भनक लागल्याने सदरचे वाहन रनाळ्याजवळ अडवून दोघांना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या ताब्यातून ४ लाख ९ ० हजार ७२३ रुपयांचा तांदुळ व ९ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १३ लाख ९ ० हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी नंदुरबार तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक समराज वाडेकर यांच्या फिर्यादीवरुन संशयित महेश सुफलकर व लालासाहेब कुल्हाडे या दोघांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दोघांना अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार करीत आहेत .