धडगांव l प्रतिनिधी
सोमवारी पहाटेच्या सुमारास शहादा येथून धडगावकडे विनापरवाना अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणारी आयशर धडगाव पोलिसांनी जप्त करून त्यात सुमारे ९ लाख रुपये किमतीचे बनावट मद्य व १३ लाख किमतीची आयशर गाडी असां एकूण २२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. परंतु, या कारवाईत हस्तगत केलेला मुद्देमाल कमी दाखवण्यात यावा याबाबतची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन १०० बॉक्स चा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धडगांव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी केली जाते. सोमवारी पहाटेच्या सुमारास अवैध दारूची तस्करी होत असतांना धडगाव शहराला लागून असलेल्या चोंदवाडे परिसरात पोलिसांनी आयशर वाहनावर कारवाई करत सुमारे शंभर दारूचे बॉक्स पकडून मुद्देमाल जप्त करत दोखांवर गुन्हा दाखल केला. मात्र, या गाडीत दोनशे दारूचे बॉक्स असतांना पोलिसांनी ते शंभर असल्याचे गुन्ह्यात नोंद करत केलेल्या कारवाईत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा पुरावा म्हणून सध्या घटनास्थळी कारवाई करणारा पोलीस कर्मचारी व आरोपी यांचा संवाद असणारी ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. यावरून व्हायरल ऑडीओ क्लिप वरून गाडीत शंभर एवजी दोनशे दारूचे बॉक्स असल्याचे संवादातून स्पष्ट होत आहे. शिवाय गुन्हा दाखल होण्यापूर्वी दारू मालक व संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यात एफ.आय. आर. कुणावर दाखल करायचा,दोनशे मधील शंभर पेटी परत करा, गुन्ह्यात शंभर पेटीच दाखवा असे संभाषण झाले. यावरून घटनास्थळी नेमका किती माल होता व किती माल सोडून देण्यात आला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.यामुळे सोडून देण्यात आलेले शंभर बॉक्स कुणी पचवले हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये कोणतेही तथ्य नाही ; परंतु त्यातील संभाषणाची सत्यता पडताळून पाहिली जाईल . तर आरोपी मार्फत दबावतंत्र असू शकते . जी . आर . औताडे , पोलिस निरीक्षक , धडगाव