नंदुरबार / प्रतिनिधी
शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पालिकेने नवीन रेल्वे बोगदा बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. २ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधी शासनाला प्रस्ताव पाठवल्यानंतर प्राप्त झाला. दीड कोटी रुपये पालिकेने सुरुवातीलाच रेल्वे विभागाला दिले होते. परंतु,७ वर्ष बोगद्याचे काम रेंगाळत राहणं ही बाब दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयाच्या पलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा होत होता. उड्डाणपुलावरून जेष्ठ,भगिनिंना ये जा करण्यासाठी त्रास होत होता. वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी सुटण्यासाठी शासनाला प्रस्ताव दिल्यावर रेल्वे बोगद्यासाठी २ कोटी ९६ लाख रुपये मंजूर झाले. दीड कोटी रुपये पालिकेकडून सुरुवातीलाच रेल्वेला देण्यात आले होते.पण, दुर्दैवाने बोगद्याचे काम अपूर्णावस्थेत राहिले. मे महिन्यात ८० लाख रुपये रेल्वे विभागाला देण्यात आल्यानंतर नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे पत्र नुकतेच दिले आहे.
*आश्वासनाची पूर्तता*
नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांना जी आश्वासने दिली आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. नंदुरबार शहराचा ४० टक्के भाग आता उड्डाणपुलाच्या पलीकडे असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणला त्यामुळे पालिकेचा पैसे वाचल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.
आता काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले, अंडर बायपासचे काम सात वर्षे रेंगाळत असेल तर त्याच्या मागचा कोणी ना कोणी काही ना काही कारण असेल असं वाटतं. उशिरा का होईना परंतु तो बोगदा लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.