नंदुरबार l प्रतिनिधी,
खेलो इंडिया निवड प्रक्रीयेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड केली जाणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र तीन वयोगटात होणार्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील चौदा खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणार्या या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्या योगासन खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यातील स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ.संजय मालपाणी यांनी केले आहे.
भारत सरकारने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्यावतीने देशभरातील योगासन खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने राज्यातील योगासन स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या स्पर्धत ९ ते १४, १४ ते १८ व १८ वर्षांपुढील मुला-मुलींचे स्वतंत्र तीन गट असतील. प्रत्येक गटात सहभागी स्पर्धकाचे वय ३१ डिसेबर २०२१ पर्यंतचे गृहीत धरले जाणार आहे.
पारंपरिक योगासन (वैयक्तिक), कलात्मक योगासन (वैयक्तिक व दुहेरी), तालात्मक योगासन (दुहेरी) व सांघिक कलात्मक (पाच खेळाडू) अशा पाच प्रकारांमध्ये होणार्या या स्पर्धतून प्रत्येक गटातील प्रत्येकी चौदा खेळाडूंची जिल्हास्तरावरुन राज्य पातळीवर, व राज्य पातळीवरुन राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे. १८ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी नावे नोंदणी करता येणार असून अधिकाधिक योगासन खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडाळकर व स्पर्धा संचालक सतिश मोहगावकर यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील योगासन खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नंदुरबार येथील सुनिल पाटील यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.