नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हाभरात आज पहिल्या टप्प्यात पाचव्या दिवशी १०४ सार्वजनिक मंडळांकडून शांततेत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये यासाठी प्रशासनाने गणरायाला निरोप देतेप्रसंगी मिरवणूक काढण्यात येवू नये, असे आदेश काढण्यात आले असल्याने गणरायाची मिरवणूक न काढता शांततेत विसर्जन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा ४२५ सार्वजनिक मंडळ, २३२ खासगी गणपती मंडळ तर १०८ एक गाव एक गणपती अशा एकूण ७६५ मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १०४ सार्वजनिक मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. यामध्ये नंदुरबार शहरातील १७, उपनगर हद्दीतील १६ तर शहाद्यातील १३ यासह विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. गणरायाला निरोप देतेप्रसंगी मिरवणूक काढण्यात येवू नये, गर्दी होणार नाही याची दक्षता मंडळांनी घेणे गरजेचे आहे. तसेच विसर्जनाप्रसंगी उपस्थित नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू यासाठी खबरदारी घेण्याच्याही सूचना पोलिस दलातर्फे देण्यात आल्या होत्या.त्यानुसार गणेश मंडळांनी गणरायाची मिरवणूक न काढता शांततेत विसर्जन केले.
पोलीसांचा तगडा बंदोबस्त
नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने विसर्जनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक पोलिस अधिक्षक, एक अप्पर पोलिस अधिक्षक, चार पोलिस उपअधिक्षक, वीस पोलिस निरीक्षक, ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, ८५५ पुरुष पोलिस कर्मचारी, १४१ महिला पोलिस कर्मचारी, ५०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, सात स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरपी व क्यूआरटी प्लाटून तसेच एक एसआरपी कंपनी असा पोलिस बंदोबस्त असणार आहे.
नंदुरबारात तीन कृत्रिम तलाव
गणेश मुर्ती विसर्जनाकरीता नंदुरबार पालिकेतर्फे वैशाली नगर २ येथील मोकळ्या जागेत, सी.बी.पेट्रोल पंपाच्यामागे महिला जीमजवळ व गजानन महाराज मंदिराजवळ पाताळगंगा नदी पात्रात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. नागरिकांनी गणेश मुर्तींचे विसर्जन या तीन ठिकाणी केले. तसेच निर्माल्य संकलनासाठी त्या ठिकाणी कुंड्यां ठेवण्यात आल्या होत्या. तसेच आज नंदुरबार नगर परिषदेमार्फत सी.बी.पेट्रोल पंपाच्यामागे, गजानन महाराज मंदिराजवळ व वैशाली मोकळ्या जागेवर तसेच सोनी विहिरजवळ मुर्ती संकलनासाठी वाहन ठेवण्यात आले होते.