नंदुरबार l प्रतिनिधी
स्वतंत्र भारतासाठी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी योगदान दिलेत, तसा देश केवळ कॉंग्रेसच चालवू शकतो. आता भाजपाची सत्ता असली तरी देश चालवणे भाजपाला शक्य नाही. आज भाजपाकडे पैसा असला तरी लोकशाहीत ही बाब विपरित ठरते, हा पैसा कायमस्वरूपी टिकणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

असली या. धडगाव येथे काॅंग्रेसतर्फे अक्कलकुवा तालुक्यातील ७९ तर धडगाव तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा माजी मंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जि.प.चे गटनेते तथा माजी सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जान्या पाडवी, प्रताप वसावे, निर्मला राऊत, हिराबाई पाडवी, जितेंद्र पाडवी, रुपसिंग तडवी, माजी जि.प.सदस्य सिताराम राऊत, हारसिंग पावरा, रविंद्र पाडवी, डीडीसी बॅंकेचे माजी संचालक विक्रम पाडवी, विलास पाडवी, गोविंद पाडवी, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, वाण्या वळवी, बिरबल पाडवी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कॉंग्रेससाठी वर्षानुवर्षे योगदान देणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्काराचा असला तरी याचवेळी नवनिर्वाचितांना विकास कामे राबविण्याबाबत उपयुक्त माहिती यशदाचे अधिकारी अशोक पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली.
धनगरांविरुद्ध मी लढणार
धनगर घुसखोरीचा प्रश्न दिवसागणिक अवघड होत चालला आहे. आज राज्यात १ कोटी २ लाख धनगर आहे, त्यांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी सर्वच पक्षांकडून पाठबळ मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील ‘धनगर आदिवासी असल्याचे पत्र दिले आहेत. कुठलाही पक्ष, नेता धनगरांच्या बाजूने उभा राहत असला तरी मी स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रात्र वैऱ्याची; लढले तरच टिकणार
धनगर आरक्षणाबाबत बोलताना माजी मंत्री ॲड. पाडवी यांनी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. युवकांनी नुसतेच पक्ष, संघटनांमधील पदे घेऊ नये, लढा उभारला पाहिजे. आज भाजप न्यायालयातूनच धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हणत लढले तरच आपला समाज टिकेल असे त्यांनी सांगितले.
सातपुड्यात कॉंग्रेस पक्षप्रेम कायम-
नंदुरबार जिल्हा राजकारणात अनेक पक्ष सक्रिय झाले असले तरी गांधी परिवाराच्या मायेने (स्व.इंदिराजींचे प्रेम) वाढलेला जिल्हा असल्याने याच जिल्ह्याच्या सातपुड्यातील जनतेच्या हृदयावर पंजा (काँग्रेस) चांगलाच कोरला गेल्याचे आजच्या जनसमुदायावरुन दिसून येते. एवढेच नव्हे तर खोलवर रुजलेल्या इंदिरा मायेमुळे सातपुड्यात काँग्रेसला नव्या कार्यकर्त्यांची फारशी आवश्यकता नाही, जुन्याच कार्यकर्त्यांवर काँग्रेस भक्कमपणे उभी असल्याचे देखील आजच्या उपस्थितीवरुन दिसते.
ॲड.पाडवी यांच्या मनोगतातील प्रमुख मुद्दे –
– एकदा तरी खासदार बनणार.
– आमदार नसलो तरी समाजकारण सोडणार नाही.
– राहुल गांधींसाठी लोकसभेत मतदान करा.
– पुढे सरपंच कार्यशाळा सुरु करणार.








