नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा ते अक्कलकुवा रस्त्यावरील मेंढवड फाट्याजवळ अतिवेगाने ट्रक चालविल्याने बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक जळून चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, गुजरात राज्यातील राजकोट येथे राहणारा दिपसिंग खिमसिंग रावत हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.जी.जे. ०३ बीडब्ल्यू ५१३१) रायपूर (छत्तीसगड) येथून भाताचा भूसा भरुन राजकोट येथे जात होते. यावेळी तळोदा ते अक्कलकुवा रस्त्यावर असलेल्या मेंढवड फाट्याजवळ अतिवेगाने ट्रक चालवित असताना ट्रकच्या बॅटरीचा स्फोट झाला.
या घटनेनंतर ट्रकच्या कॅबिनला आग लागली. याप्रसंगी चालक दिपसिंग रावत यांचे वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला ट्रक उलटल्याने दिपसिंग रावत जळून जागीच ठार झाले. तसेच ट्रकमध्ये भरलेला भाताचा भुसा व ट्रकचे नुकसान झाले. याबाबत पोहेकॉ.वनसिग भोंग्या पाडवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात मयत दिपसिंग रावत याच्याविरोधात भादवि कलम ३०४ (अ), २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.








