नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भोणे येथे जे.सी.बी., डंपर व ट्रॅक्टर अवैधरित्या सुरु असल्याचे तहसीलदार यांना सांगितल्याच्या रागातून एकाच्या घरात घुसून पाईपने मारहाण करीत रोकडसह चांदीचे दागिने असा सुमारे १८ हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरी चोरी केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील योगेश नामदेव पाटील यांनी तहसीलदार यांना जे.सी.बी., डंपर व ट्रॅक्टर अवैधरित्या सुरु असल्याचे सांगितले. या कारणावरुन योगेश पाटील यांच्या घरात घुसून संभाजी पंडीतराव पाटील याने लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच रामचंद्र पंडीतराव पाटील यानेही हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली व योगेश पाटील यांच्याकडू ७ हजाराची रोकड, ८ हजार रुपये किंमतीचे चांदीचे ब्रासलेट, २८०० रुपये किंमतीची चांदीची चेन असा एकूण १७ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज जबरीने काढून घेतला. याबाबत योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३९२, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत.








