नंदूरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व फुटबॉल एफ.सी.बायर्न म्युनिक, जर्मनी क्लब यांच्यावतीने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रचार होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 10 फेब्रुवारी,2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय फुटबॉल एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व फुटबॉल एफ.सी. बायर्न म्युनिक, जर्मनी क्लब यांच्यावतीने क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून फुटबॉल खेळाडूंना जर्मनी येथे फुटबॉल खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार राज्यातील 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी जिल्हास्तर, विभागस्तर, व राज्यस्तर याप्रमाणे एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक जर्मनी येथे येणे-जाणे, निवास, प्रशिक्षण व इतर बाबीवरील खर्च शासनामार्फत करण्यात येईल.
स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लबांनी 14 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ 10 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल,नंदुरबार येथे सकाळी 9 वाजता उपस्थित ठेवावा. स्पर्धेसाठी फुटबॉल संघातील खेळांडुची जन्मतारीख 1 जानेवारी,2009 नंतरची असावी.
स्पर्धेत विजयी झालेला संघ विभागीयस्तरावर नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार असून इतर संघातून 5 खेळाडुंची निवडचाचणीसाठी निवड करण्यात येईल. प्राचार्य, मुख्याध्यापक, फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब चालकांनी खेळाडूंच्या संघाची प्रवेशिकेसाठी 9 फेब्रुवारी,2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार कार्यालयात संपर्क करावा. यास्पर्धेसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक फुटबॉल खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.