नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील अक्कलकुवा तालुक्यातील गुलिआंबर, चाटुवाड, खापर, ब्राह्मणगाव या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून चार बिबट्यांचा वावर आहे. गेल्या आठवड्यात खापर येथील दोन गाई व ब्राह्मणगाव येथील दोन गाईंचा या बिबट्यांनी फडशा पाडून ठार केल्या आहेत.
खापर आणि ब्राह्मणगाव दरम्यान असलेल्या गोशाळेवर सर्वात आधी या बिबट्यांनी हमला केला होता. या गावांमधील नागरिकांनी महाराष्ट्र शासनातील अक्कलकुवा तालुक्यातील वनविभागाला निवेदन देऊन सदर बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी केली होती. परंतु अक्कलकुवा वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला जेरबंद करण्यास दुर्लक्ष करण्यात येत होतं.
याच बिबट्याद्वारे गुजरात राज्यातील अनेक गावांमध्ये देखील मानवी जीवनास व पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला होता. अखेर गुजरात वनविभागाच्या पथकाने पिंजरा लावून आज सकाळी एका बिबट्याला जेरबंद केला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या वन विभागाच्या पथकाने देखील घटनास्थळी दाखल होत कारवाईत सहकार्य केले.
या परिसरात एकूण चार बिबट्यांचा वावर असून त्यापैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी. आणखी तीन बिबट्या या परिसरात मोकाट फिरत असून वनविभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक शेतातील कामे करण्यासाठी देखील धजावत आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे. शेतकरी व नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने सदर बिबट्यांना जेरबंद करून नागरिकांना वन्य प्राण्यांपासून असलेला धोका कमी करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.








