नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कुढावद गावाजवळ ट्रक रिव्हर्स घेतांना ट्रकच्या चाकाखाली आल्याने एक जण ठार झाल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे शहरातील श्रीराम नगरातील ट्रक चालक सतिष चंद्रसिंग गिकरासे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.एम.एच.१८ एए ७९९३) शहादा तालुक्यातील कुढावद गावाच्या शिवारातील कच्च्या शेत रस्त्यावर ट्रक रिव्हर्स घेत होते. यावेळी त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दिशा दर्शवित असतांना निष्काळजीपणे ट्रक चालवून रविंद्र भटा पाटील (रा.विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळ, नगाव ता.धुळे) यांना धडक दिल्याने रविंद्र पाटील हे ट्रकच्या चाकाखाली अल्याने ठार झाले.
याबाबत अविनाश संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात ट्रक चालक सतिष गिरासे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामदास पावरा करीत आहेत.